कऱ्हाड : बाबरला दुचाकीवरून बबलूपर्यंत पोहोचविणारा कऱ्हाडातील गॅरेजवाला अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. तासवडे-एमआयडीसी येथील टोलनाक्यावर सोमवारी पहाटे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. फिरोज बशीर कागदी (वय ३३, रा. शिंदे गल्ली, शनिवार पेठ, कऱ्हाड) असे अटक केलेल्या गॅरेजवाल्याचे नाव आहे. दरम्यान, बबलूला गोळ्या घातल्यानंतर बाबरला तेथून दुचाकीवरून घेऊन जाण्यासाठी फिरोज घटनास्थळापासून काही अंतरावर थांबला होता. मात्र, जमावाने बाबरला घेरल्याचे व त्याला ठेचून ठार मारल्याचे दिसताच तो घाबरून तेथून पळून गेल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली. शहरातील मंडईमध्ये सोमवारी (दि. २०) सकाळी नऊच्या सुमारास बबलू माने याचा बाबर खानने गोळ्या घालून खून केला. त्यानंतर त्याच ठिकाणी जमावाने बाबरला ठेचून ठार मारले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बाबरवर बबलूच्या खुनाचा, तर अज्ञातांवर बाबरला ठार मारल्याचा वेगवेगळा गुन्हा दाखल करण्यात आला. बाबरच्या खूनप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी तीन युवकांना अटक केली आहे. त्या तिघांनीही बाबरला ठेचून ठार मारल्याची कबुली दिली आहे. मात्र, बबलूच्या खून प्रकरणाचे महत्त्वाचे धागेदोरे हाती असूनही संशयित पोलिसांच्या हाती लागत नव्हते. कऱ्हाड शहर पोलिसांना रविवारी रात्री या प्रकरणातील संशयित फिरोज कागदी हा मुंबईहून ट्रॅव्हल्स अथवा खासगी बसने कऱ्हाडकडे येत असल्याची माहिती मिळाली. तसेच तो तासवडे टोलनाका येथे वाहनातून उतरणार असल्याचेही समजले. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचला. सोमवारी पहाटे टोलनाक्यापासून काही अंतरावरून एक व्यक्ती चालत येत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याला पकडून त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी तो फिरोज कागदी असल्याचे निष्पन्न झाले. त्याला तातडीने अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)कऱ्हाड ते मुंबई व्हाया लातूरकऱ्हाडातून पळाल्यानंतर फिरोज पहिल्यांदा इस्लामपूरमध्ये गेला. तेथून मिरज, मालेगाव, कवठेमहांकाळ, लातूर, स्वारगेट, ठाणे, बेळगाव व परत तो मुंबईला निघून गेला. मंगळवारी पहाटे तो पुन्हा कऱ्हाडला येत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. सहा दिवस कोठडीफिरोजला पोलिसांनी मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला १ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बबलूचा गेम करण्याचा कट कोणी रचला, कुठे रचला, मास्टरमाइंड तसेच आणखी संशयित कोण, गुन्ह्यात किती पिस्तुलांचा वापर केला व गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीबाबत पोलीस फिरोजकडे तपास करीत आहेत. बाबरला ठेचताच फिरोज पळालाबाबरने बबलूला गोळ्या घातल्या तेव्हा फिरोज दुचाकी चालू करून कन्या शाळेनजीक थांबला होता. तो बाबरला घेण्यासाठी येणार होता. मात्र, जमावाने बाबरला घेरल्याचे व ठेचून ठार मारल्याचे पाहताच फिरोजने घाबरून दुचाकीवरून तेथून पळ काढल्याचे वरिष्ठ निरीक्षक पाटील यांनी सांगितले. फिरोज दुचाकी ‘रायडर’बबलूला गोळ्या घालण्यापूर्वी सकाळपासूनच बाबर व फिरोज सोबत होते. सकाळी पालिकेनजीकच्या हॉटेलमध्ये फिरोज नाष्टा करीत होता. बाबर त्याठिकाणी आल्यानंतर ते दोघे दुचाकीवरून आंबेडकर पुतळ्यानजीक आले. तेथून ते बबलूवर पाळत ठेवीत मंगळवार पेठेत गेले. त्यानंतर कन्या शाळेपासून परत येऊन मच्छी मार्केटनजीक ते थांबले. तेथून बाबर चालत बबलूच्या दिशेने गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. वैर संपले म्हणाला; पण गोळ्या घातल्या !या खून प्रकरणात दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. बबलू व बाबर वर्गमित्र असल्याची माहिती सध्या पोलिसांना मिळाली आहे. दोघांत पूर्ववैमनस्य आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी बाबरने बबलूची भेट घेऊन ‘तुझ्या आणि माझ्यातील सगळे प्रॉब्लेम संपलेत, आता आपल्यात काही वाद नाही,’ असे सांगितले होते. हे सांगण्यामागे बबलूला बेसावध ठेवण्याचा बाबरचा प्लॅन असावा, असा पोलिसांचा कयास आहे. या माहितीची पोलीस खातरजमा करीत आहेत.
बाबरचा ‘सारथी’ गॅरेजवाला अटकेत
By admin | Published: July 27, 2015 11:11 PM