शेखर जाधव ।वडूज : कोयत्यावर मेहनताना ठरवून आणलेल्या ऊसतोड महिलेने काम सुरू असतानाच मुलीला जन्म दिला. बाळंत झाल्यानंतर काही तासांतच ही कामगार ओल्या अंगानेच ऊसतोड करायला शेतात अवतरली. बाळंतपणानंतर लगेचच उभ्या राहिलेल्या या माऊलीला शेताच्या मालकिणीनं बाळंतविडा देऊन विश्रांती घेण्याचेही सांगितले; पण यानिमित्ताने ऊसतोड कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न अजूनही गंभीर असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
नायकाचीवाडी, ता. खटाव येथे ऊसतोड सुरू आहे. यासाठी ढाकणवाडी (वडगाव) ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथील माळकरी सांप्रदायातील विक्रम रघुनाथ ढाकणे आपल्या दोन मुले, दोन सुना व नातवंडे यांच्यासोबत ऊस तोडणीसाठी आले आहेत. त्यांची सून मुक्ताबाई बाळासाहेब ढाकणे हिची प्रसूती झाली आणि तिने एका निरोगी मुलीला जन्माला घातले. प्रसूती होण्यापूर्वी मुक्ताबाई वडूज येथील मंगल राजाराम गोडसे यांच्या शेतात ऊसतोड करीत होती. तर प्रसूतीच्या चोवीस तासांनंतर ती पुन्हा फडात येऊन ऊसतोड करायला उभी राहिली. मुक्ताबार्ईचं हे दुसरं बाळंतपण असून, तिला मोठी मुलगीच आहे.
वडूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळंत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला घरी सोडण्यात आले. घरी आल्यानंतर विश्रांती घेण्याऐवजी तिने नवजात बालिकेसह उसाचा फड गाठला. फडाच्या एका बाजूला मुलीला झोपवून ती पुन्हा कामाला लागली. उसाच्या फडात शेकडो मुक्ताबाई अजूनही भाकरीच्या अर्ध्या चंद्रासाठी राबत आहेत, हे निश्चित.
मालकिणीनं दिला बाळंतविडादोन दिवसांपूर्वीच पोटुशी दिसणारी मुक्ताबाई बाळासह शेतात आल्याचं समजल्यावर शेताच्या मालकीण मंगल गोडसे शेतात पोहोचल्या. त्यांनी येताना तिच्यासह बाळासाठी उबदार कपडे, अंथरुण, पांघरुण आणि बाळंतविडा आणला. आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांनी या बाळाचे नाव कल्याणी ठेवण्याचाही सल्ला दिला.
यासाठी घ्यावी विश्रांती
- बाळंतपणानंतर झालेली झीज भरून काढण्यासाठी
- शरीरातून होणारा रक्तस्त्राव नियंत्रणात आणण्यासाठी
- बाळाला पुरेसं दूध मिळण्यासाठी
- शरीरात झालेले बदल पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी
- बाह्य वातावरणातील संसर्गापासून बचावासाठी
वेळेत काम पूर्ण झालं नाही तर आमचे मोठे नुकसान होते. माझ्या बाळंतपणानं आमचा एक कोयता काम करणार नाही, त्यामुळे अख्ख्या कुटुंबावर संकट येऊ शकतं. बाळ आणि मी आम्ही दोघीही टणटणीत असल्यामुळे उसाच्या फडात काम करताना मला काही वेगळं जाणवलं नाही, आमच्याकडे हे असंच असतं.- मुक्ताबाई, ऊसतोड कामगार