नागठाणे : नागठाणे, ता. सातारा येथील घाडगे हॉस्पिटलमध्ये महिलेची प्रसूती करताना बाळ दगावल्याच्या ठपका ठेवून डाॅ. विकास घाडगे, डाॅ. मेघा घाडगे यांच्यासह चौघांना मंगळवारी सायंकाळी बोरगाव पोलिसांनी अटक केली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नीलम बेंद्रे (वय ३२, रा. नागठाणे) या १ फेब्रुवारी रोजी प्रसूतीसाठी नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी डॉ. विकास घाडगे ऐवजी कम्पाउंडर नीलेश घाडगे याने नीलम बेंद्रे यांना मागच्या दाराने ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले. तर नर्स कोमल गायकवाड हिच्या मदतीने तिची प्रसूती करताना बाळाचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर मीरा-भाईंदरचे माजी नगरसेवक सोमनाथ पवार यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांना भेटून कारवाईची मागणी केली होती.दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी संबंधितांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल बोरगाव पोलिसांना सादर केला. त्यानंतर पोलिसांनी डॉ. विकास घाडगे, डॉ. मेघा घाडगे, कम्पाउंडर नीलेश घाडगे आणि नर्स कोमल गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तातडीने डाॅक्टर दाम्पत्यासह चाैघांना अटक केली.
न्यायालयाने नीलेश घाडगे व कोमल गायकवाड या दोघांना दि. ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली तर डॉ. विकास घाडगे, डॉ. मेघा घाडगे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.