सातारा - पहिलं बाळंतपण म्हटलं की सगळं घर डोहाळं जेवणाची तयारी करायला घेतं. पहिल्या बाळंतपणाला गर्भवतीचं डोहाळे जेवण करणं यात तसं काही नवं नाही. पण कधी तुम्ही एखाद्या गाईचं डोहाळं जेवणं घातल्याचं ऐकलं किंवा पाहिलं आहे का ? नक्कीच नसणार. पण साता-यातील एका कुटुंबाने आपल्या लाडक्या गाईचं डोहाळं जेवण घालून संपूर्ण गावासमोर आदर्श उभा केला आहे.
साता-यातील खातगुण गावातल्या धनंजय लावंड कुटंबाने आपल्या सूनेसोबत गाईचंही डोहाळं जेवण घालण्याचा निर्णय घेतला होता. कावेरी ही त्यांची लाडकी गाय आहे. आपल्या पोटच्या पोरीप्रमाणे ते तिचा सांभाळ करतात. म्हणूनच मग त्यांनी सूनेसोबत गाईचंही डोहाळे जेवण घातलं. लावंड कुटुंबाने आपल्या सुनेच्या आणि गाईच्या डोहाळे जेवणासाठी संपूर्ण गावाला निमंत्रित केलं होतं. विशेष म्हणजे गावातल्या इतर गायींनाही कावेरीच्या डोहाळजेवणासाठी निमंत्रण होतं.
इतकंच नाही तर लावंड कुटुंबाने त्यांनी सूनेसोबत गाय कावेरीचीही साडी व हारासहीत ओटी भरली. तिचं औक्षणही करण्यात आलं, सोबतच गोडधोड पदार्थही खाऊ घालण्यात आले. गाईचं महत्त्व समजावं यासाठी हे डोहाळे जेवण केल्याचं लावंड कुटुंबीयांनी सांगितलं.