दरम्यान, किरपे येथे घेण्यात आलेल्या शिबिरात बाधितांच्या सहवासात आलेल्या दहा व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल बुधवारपर्यंत प्राप्त झाला नव्हता. परिसरातील ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण कायम आहे.
घारेवाडी येथील एका दूध व्यावसायिकास कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तीन सदस्य बाधित आले होते. त्यानंतर गावात प्राथमिक आरोग्य केंद्राने शिबिर घेऊन ६२ ग्रामस्थांचे नमुने घेतले होते. त्यापैकी बाराजणांचे अहवाल आरटीसीपीआर चाचणीद्वारे पॉझिटिव्ह आले होते. या अहवालानंतर संबंधित बाधितांनी कऱ्हाडला कृष्णा jुग्णालयत तपासणी करून घेतली. त्या तपासणीत सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. परिणामी गोंधळ निर्माण झाला आहे. सोळा रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आल्यानंतर कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने त्यांच्या सहवासात आलेल्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली. मंगळवारी घारेवाडी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कृष्णा रुग्णालयात तपासणी केलेले अहवाल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेल्या तपासणीत विसंगती दिसून आल्याने भीतीपोटी ग्रामस्थांनी तपासणीस नकार दर्शविला. पोलीसपाटील यांच्यासह केवळ पाच ग्रामस्थांनीच या शिबिरात तपासणी करून घेतली आहे.
- चौकट
किरपेत करावी लागली जागृती
घारेवाडी येथील बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किरपे येथील बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यासाठी किरपे येथेही शिबिर आयोजित करून दहाजणांचे स्वॅब घेण्यात आले. मात्र, त्यांनीही स्वॅब देण्यासाठी प्रथम नकार दर्शविला होता. यावेळी वैद्यकीय टीमने कोरोनामुळे होणारे धोके आणि फायदे याविषयी माहिती देऊन भीती, शंका दूर केल्यानंतर ग्रामस्थ स्वॅब देण्यासाठी स्वत:हून पुढे आले.