कुडाळ : जावळी तालुका राष्ट्रीय महामार्ग चारला जोडण्यासाठी मेढा-पाचवड हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र गेले अनेक दिवसांपासून या मार्गावरील सरताळे ते दरे बुद्रुक यादरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, अनेक लहान-मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
मेढा-पाचवड मार्गावरील कुडाळ हे तालुक्यातील बाजारपेठेचे एक मुख्य ठिकाण आहे. तसेच तालुक्यातील पश्चिम भागातील लोकांनाही मुंबई, पुणे या शहरात जाण्यासाठी हा नजीकचा मार्ग झालेला आहे. मात्र गेले अनेक दिवसांपासून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. म्हसवे फाटा ते बोराटेवस्ती दरम्यान रस्त्याचा काही भाग खड्डेमय झाला आहे. तसेच डबडेवाडी, सोनगाव फाटा यादरम्यान काही ठिकाणी रस्ता खचलेला आहे. साइडपट्ट्याही खोल असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही, यामुळे या रस्त्याने प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठीचा हा मुख्य रस्ता कायमच रहदारीचा आहे. दिवसभर या मार्गावर वाहतूक सुरू असते. सध्या भागात पाऊस झाल्याने या खड्ड्यात पाणी साचले आहे. वाहनचालकांना यामुळे मोठी कसरत करावी लागत आहे. यापूर्वीही या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. यामुळे गांधारीची भूमिका घेणाऱ्या बांधकाम विभागाच्या डोळ्यावरील पट्टी कधी निघणार का? एखाद्या मोठ्या अपघातानंतरच जागे होणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. बांधकाम विभागाने तत्काळ याकडे लक्ष देऊन या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी वाहनचालक तसेच परिसरातील ग्रामस्थांची तीव्र मागणी आहे.
(कोट)
पावसाळा सुरू झाला असून, सरताळे-कुडाळ हद्दीत व पुढे दरे बुद्रुक गावापर्यंत मेढा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. अशातच काही ठिकाणी रस्ता खचलेला आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याअगोदर रस्त्यावर साइडपट्ट्यांमुळे अपघातही झाले आहेत. बांधकाम विभागाने तत्काळ दुरुस्ती करावी आणि होणारे संभाव्य अपघात टाळावेत. अन्यथा बांधकाम विभागाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल.
- कृष्णात मोरे, जिल्हाध्यक्ष, वंचित आघाडी गवई गट
फोटो :
२३ कुडाळ रस्ता..
मेढा-पाचवड रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे.