कऱ्हाड : गुहाघर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर सुर्ली घाटातील रस्त्याची दयनीय आवस्था झाली आहे. घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने ३० नोव्हेंबरपर्यंत सुर्ली घाट व ओगलेवाडी रेल्वे पुलावरील रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा सर्वपक्षीयांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.याबाबत प्रांत कार्यालयाला निवेदन देण्यात आले. यावेळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, भीमराव ढमाले, नवनाथ पाटील, अधिक सुर्वे, दिगंबर डांगे, मुरारजी माने, मिलिंद सुर्वे, सर्जेराव पानवळ, मानव कल्याणकारी संघटनेचे सलीम पटेल, सुरेश वेताळ, आनंदा माने, विजय आतकरे, सोहेल तांबोळी, अरविंद यादव व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रशांत यादव म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून कराड-विटा रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, सुर्ली घाटातील रस्ता वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने जवळपास तीन वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. तर विद्यार्थी, शेतकरी व नोकरदार वर्गालाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने ३० नोव्हेंबरपर्यंत सुर्ली घाट व रेल्वे पुलावरील रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा सुर्ली, कामथीसह परिसरातील गावांतील ग्रामस्थांना सोबत घेऊन तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष...सुर्ली घाटातील रस्त्याचे काम तातडीने करावे यासाठी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.
सातारा: सुर्ली घाटातील रस्त्यासाठी आत्मदहनाचा इशारा, रस्त्याची अवस्था बनलीय दयनीय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 6:23 PM