कोपर्डे हवेली : वडोली नीळेश्वर ते कोपर्डे हवेली रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. हा रस्ता चार किलोमीटरचा आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची रूंदी कमी असल्याने समोरासमोर चारचाकी वाहने आल्यास वाहतुकीची कोंडी होते. कोपर्डे हवेली ते पार्ले रेल्वे फाटकापर्यंत खड्ड्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत असून, रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याऐवजी संपूर्ण रस्ता नवीन करावा, अशी मागणी होत आहे.
मलकापूर कॉलनीत स्वागताला खड्डा
मलकापूर : आगाशिवनगरसह शहरात गटारालगत सांडपाणी वाहून जाण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. काम झाल्यानंतरही चर बुजवण्याचे काम व्यवस्थित न केल्यामुळे प्रत्येक कॉलनीत प्रवेश करताना खड्डाच प्रत्येकाचे स्वागत करत आहे. तसेच केबलच्या कामासाठी उपमार्गावर खोदलेले व पावसाने पडलेले खड्डे धोकादायक बनले आहेत. जागोजागी खड्डे पडल्याल्यामुळे नागरिकांसह वाहनचालक संताप व्यक्त करत आहेत.
शामगाव विभागात मोकाट श्वानांचा उपद्रव
शामगाव : परिसरात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. शामगाव, अंतवडी, रिसवड, करवडी आदी गावांमध्ये वीस ते तीस अशा मोठ्या संख्येने श्वान गावात व शिवारात फिरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. तसेच रस्त्यावर अडथळे निर्माण होत आहेत. लहान मोठे अपघात होत आहेत. मोकाट श्वानांकडून पाळीव जनारांवर हल्ला केला जात आहे. त्यामुळे जनावरे दगावण्याची भीती आहे. तसेच लहान मुलांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे श्वानांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
मसूर ते निगडीपर्यंत रस्त्याची अवस्था दयनीय
मसूर : मसूर ते निगडी या सुमारे दोन किलोमीटर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मसूर ते निगडी हा जवळचा रस्ता म्हणून ग्रामस्थ त्याचा वापर करतात. मात्र, गत दोन वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याने प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. संबंधीत विभागाने पाहणी करून रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मुख्य रस्त्याकडेला पुन्हा हातगाड्यांचे अतिक्रमण
कऱ्हाड : येथील बसस्थानक ते विजय दिवस चौक परिसरातील रस्त्याकडेला चायनीज, वडापाव तसेच फळविक्रेते व साहित्य विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी विद्यार्थी व प्रवाशांना रस्त्यावरून चालावे लागत आहेत. कऱ्हाड पालिकेच्यावतीने काही महिन्यांपूर्वी अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढलेल्या अतिक्रमणांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
कॅनॉल ते कॉलेजपर्यंत पादचारी मार्ग दुरवस्थेत
ओगलेवाडी : कृष्णा कॅनॉल ते कॉलेज रस्त्याकडेला असलेल्या पादचारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी कठडे ढासळले आहेत. तसेच त्याखालील नाल्यातील सांडपाणीही रस्त्यावरून वाहात आहे. सांडपाण्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच कृष्णा कॅनॉलपासून बनवडीपर्यंतचा रस्ताही दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.
ढेबेवाडी फाटा चौकात वाहतुकीचा बोजवारा
मलकापूर : ढेबेवाडी फाटा येथे वाहनचालक अस्ताव्यस्तपणे रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. ढेबेवाडीफाटा हे परिसरातील मध्यवर्ती केंद्र आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तसेच वडाप वाहनेही याचठिकाणी थांबतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.