मायणी : मायणी (ता. खटाव) येथील चांदणी चौकामध्ये राज्यमार्गाच्या गटारीचे बांधकाम न करताच रस्त्याचे काम सुरू केल्याने संपूर्ण चौक परिसरामध्ये गटारीचे पाणी साठले आहे. या साठलेल्या सांडपाण्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. या कामावर सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसत असून, संबंधित ठेकेदाराच्या कामात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.
मायणी परिसरामध्ये गेल्या वर्षभरापासून मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. गतवर्षी जानेवारीपासून ते आजअखेरपर्यंत मायणी मुख्य बाजारपेठेतील फक्त सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतराचे काम चालू आहे, तेही काम अजून पूर्णत्वाकडे गेले नाही. या एक ते दीड किलोमीटरच्या अंतरातील अनेक ठिकाणचे गटारीचे काम अनेक कारणांमुळे अर्धवट अवस्थेत पडून आहे. यावर कोणताही तोडगा किंवा उपाययोजना होताना दिसत नाही.
येथील मुख्य चांदणी चौक परिसरातील मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सुरू असलेले गटारीचे बांधकाम अनेक ठिकाणी गेल्या चार-पाच महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे, तर गेल्या आठवड्यापासून याच चांदणी चौकातून जाणाऱ्या मिरज-भिगवण नियोजित (राष्ट्रीय महामार्गाच्या) छेदाच्या दोन्ही बाजूचे सुमारे पन्नास मीटर अंतराचे रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे.
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत व नियोजनशून्य असल्याने रखडले आहे. या संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य तोडगा व उपाययोजना होताना दिसत नसल्याने या चांदणी चौकातील व्यापारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली.
चौकट :
नियोजनाचा अभाव.. कामे अर्धवट..
मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचे मायणी ते दिघंची या सुमारे ४० किलोमीटर अंतराच्या कामावर सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालय पंढरपूर यांचे नियंत्रण आहे. मात्र या विभागाचे संबंधित अधिकारी या कामाकडे पूर्णवेळ लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे या कामादरम्यान अनेक तक्रारी, वादविवाद, नियोजनाचा अभाव व काम अर्धवट राहताना आहे.
(चौकट )
रहदारीच्या ठिकाणची कामे मार्गी लावा..
चांदणी चौक परिसराकडे मायणी गावाचा बाजारपेठेचा व दळणवळणाचा भाग म्हणून पाहिले जाते. या मार्गाच्या दोन्ही बाजूला रहिवासी वसाहत, व्यापारी गाळे तसेच वाहनचालक खरेदीसाठी व व्यवसायासाठी वाहने उभी करत असतात. याचमार्गाने शेकडो विद्यार्थी रोज शिक्षणासाठी ये-जा करत असतात. त्यामुळे वास्तविक पाहता या रहदारीच्या ठिकाणचे काम लवकर पूर्ण होणे गरजेचे होते.
25मायणी सांडपाणी
मायणी येथील मल्हारपेठ-पंढरपूर व मिरज-भिगवण राज्यमार्गाच्या छेदाच्या ठिकाणी असलेल्या चांदणी चौकामध्ये असे सांडपाणी साठले आहे. (छाया : संदीप कुंभार)