संजय पाटील ।कऱ्हाड : कागदी पिशव्यांच्या माध्यमातून महिलांना रोजगार देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात कऱ्हाड तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून कागदी पिशव्या हस्तगत करण्यासाठी सध्या पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
‘वर्ल्ड ट्रस्ट दे मनी’ कंपनीचा एजंट भाऊसाहेब तवर (रा. बेलवडे, ता. कडेगाव), मनीषा जाधव (रा. आंबेगाव, ता. कडेगाव), इकबाल शिकलगार (रा. वांगी) अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत.कऱ्हाड तालुक्यातील वारुंजी, मुंढे, सुपने, बेलदरे, तांबवे या परिसरातील महिलांना घरबसल्या रोजगार मिळवून देण्याचे आमिष दाखवत भाऊसाहेब तवर, मनीषा जाधव व इकबाल शिकलगार या तिघांनी फसवल्याचा आरोप आहे. तांबवे येथे काही महिन्यांपूर्वी भाऊसाहेब तवर हा गेला होता. त्याने सुजाता पवार यांच्यासह अन्य महिलांना भेटून ‘वर्ल्ड ट्रस्ट दे मनी’ या कंपनीची आणि या कंपनीमार्फत महिलांना दिल्या जाणाऱ्या रोजगाराची माहिती दिली. त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तांबवेतील महिलांनी गटाच्या माध्यमातून पैसे गोळा करून ते भाऊसाहेब तवर याच्याकडे दिले. मात्र, फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलांनी याबाबतची फिर्याद शनिवारी कऱ्हाड तालुका पोलिसांत दिली.
दरम्यान, भाऊसाहेब तवर याच्यासह मनीषा जाधव व इकबाल शिकलगार यांनी बेलदरे, सुपने, वसंतगड, मुंढे येथील महिलांकडूनही पैसे घेतले होते. बेलदरे, सुपने, वसंतगड येथील १०३ महिलांचे ६७ हजार ५३ रुपये तर मुंढे येथील रुपाली अविनाश पवार व वारुंजी येथील उल्का सतीश पाटील यांच्याकडून १३६ महिलांचे ८८ हजार ५३६ रुपये असे या भागातून एकूण २ लाख २० हजार ३८ रुपये घेतल्याची फिर्याद महिलांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. तसेच गत चार महिन्यांत तांबवे भागातील महिलांनी बनविलेल्या लाखो पिशव्याही या आरोपींनी नेल्या आहेत. त्या पिशव्या सध्या एका गोदामामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या पिशव्या जप्त करण्याच्यादृष्टीने सध्या पोलीस आरोपींकडे चौकशी करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर तपास करीत आहेत.आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यतारोजगाराच्या नावाखाली सभासद फी उकळून महिलांची फसवणूक करणाऱ्या या टोळीने अनेक जिल्ह्यांत आपले हात पसरले आहेत. कऱ्हाडतालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आता तालुक्यातील गावागावातून यासंदर्भात तक्रारी येत आहेत. त्यामुळे या टोळीवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.