फलटण: येत्या २९ जूनला बकरी ईद साजरी होत आहे. याच दिवशी महाराष्ट्राचे अध्यात्मिक दैवत विठुरायाची आषाढी एकादशीही आल्याने या दिवशी बकरी ईदची कुर्बानी न देता एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.३०) सण साजरा करण्याचा निर्णय फलटण शहर आणि तालुक्यातील मुस्लीम समुदायाने घेतला. अन् सौहार्द व सद्भावनेचे उत्तम उदाहरण घालून दिले.फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील आणि ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी मुस्लिम समुदायातील मान्यवर तसेच विविध मशिदीचे प्रमुख यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुस्लिम समुदायाने सकारात्मकता दाखवून आषाढी एकादशी दिवशी हिंदू बांधवांच्या भावना जपण्यासाठी यादिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐच्छिक असला तरी जवळपास सर्व मुस्लिम समुदायाने व मौलानांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या निर्णयाचे नागरिकांतून स्वागत होत आहे.फलटण तालुक्याला ऐतिहासिक परंपरा असून सर्व समाजामध्ये प्रेमाचे व एकतेचे वातावरण आहे. हिंदू समाजाबरोबर मुस्लिम समाज नेहमी सर्व सण उत्साहात साजरे करत असतो. त्यामुळे एकादशी दिवशी बकऱ्याची कुर्बानी न करता इतर दिवशी करण्याचा निर्णय घेण्यात आला तसे पत्रही पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना देण्यात आले. पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनीही मुस्लिम समुदायाच्या निर्णयाचे कौतुक केले.
फलटण तालुक्यात आषाढी एकादशीनंतर बकरी ईदची कुर्बानी, मुस्लिम समुदायाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 1:44 PM