अशोक पाटील -q इस्लामपूर -कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना, कर्मचाऱ्यांना दिलेली आश्वासने, कारखाना सक्षम करण्यासाठी भविष्यातील नियोजन, आर्थिक स्थिती, कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी होणारा खर्च यावर चर्चा करण्यासाठी सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांनी कऱ्हाड येथील कृष्णा ट्रस्टवर नूतन संचालकांची बैठक घेतली. कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक चुरशीने झाली होती. सभासदांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या पॅनेलकडे पुन्हा कारखान्याची धुरा सोपवली. कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया होण्याअगोदरच डॉ. भोसले यांनी नूतन संचालकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कारखान्याच्या आर्थिक स्थितीचा रोख-ठोक ताळेबंद मांडला. बैठकीस विजयी आणि पराभूत झालेले सहकार पॅनेलचे १९ प्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीत त्यांनी कारखाना सक्षम करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, यावर प्रदीर्घ चर्चा केली. सध्या कारखान्याला अधिकाऱ्यांसह ११५0 कामगारांची गरज आहे. परंतु सध्या कारखान्याकडे कायमस्वरुपी, हंगामी, ट्रेनी अशा पदांवर एकूण तीन हजार कामगार आहेत. शेती खात्यात १२५ कामगारांची गरज असताना, येथे सध्या ४00 कामगार कार्यरत आहेत. सर्व कामगारांच्या पगारापोटी जवळजवळ वर्षाकाठी २३ कोटी रुपये खर्च केले जातात. कारखाना सक्षमपणे चालविण्यासाठी फक्त ११५0 कामगारांची गरज असून यांच्या पगारापोटी ११ कोटी रुपये खर्च होतील. कामगार कपात केल्यास कारखान्याचे १२ कोटी रुपये वाचणार आहेत. यावर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.माजी अध्यक्षांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कामगारांची भरती करून घेतली. मात्र प्रत्यक्षात या कामगारांना कामच देता आलेले नाही. त्यांना अत्यल्प पगाराच्या ‘आॅर्डर’ दिल्या आहेत. काही संचालकांनाही कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार काढल्याचे समजले आहे. याचीही चौकशी करण्याचा निर्णय यावेळी बैठकीत करण्यात आला.नआश्वासने पाळणार का? यावेळी झालेल्या बैठकीत ४ जुलै ैरोजी होणारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड, तसेच सभासदांना फुकट साखर देण्याच्या आश्वासनावर कोणतीही चर्चा झाली नाही. जे कामगार अतिरिक्त आहेत, त्यांना कमी करण्यावरच बैठकीत मंथन झाले. त्यामुळे निवडणुकीत डॉ. भोसले यांनी दिलेली आश्वासने ते कितपत पाळतात, हे येणारा काळच सांगणार आहे.
सुरेश भोसले यांनी मांडला कृष्णा कारखान्याचा ताळेबंद
By admin | Published: July 01, 2015 11:25 PM