प्रमोद सुकरेकराड : सातारचे लोकप्रिय खासदार म्हणून ओळख मिळवणारे आता त्यांच्याच कराड पाटणमधील स्वकियांना अप्रिय वाटू लागलेत म्हणे! खासदार श्रीनिवास पाटील किंवा सारंग पाटील यांच्या उमेदवारीला कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडून विरोध होत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे कराड पाटण तालुक्यातील राष्ट्रवादीत काहिशी अस्वस्थताही दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लोकसभेच्या निवडणुकीत तत्कालीन खासदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर अचानक एक नवखा उमेदवार उभा राहिला. त्या उमेदवाराचं नाव होतं श्रीनिवास पाटील! राजकीय पटलावर कधीच नसणारे श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीच्या लाटेत खासदारही झाले. पण त्यानंतर प्रशासकीय कामावर पकड असणाऱ्या श्रीनिवास पाटील यांची कार्यपद्धती आणि त्यांची ओघवती भाषाशैली यामुळे ते कधी लोकप्रिय बनले हे कळालेच नाही.
थोरल्या पवारांचे मित्र असणारे श्रीनिवास पाटील त्यानंतर आणखी २ वेळा खासदार झाले. तर सिक्कीमचे राज्यपाल म्हणून ५ वर्षे त्यांनी कार्यकीर्द भूषवली. या दरम्यानच्या काळात त्यांचे सुपुत्र सारंग पाटील यांनी एकदा पदवीधर मतदारसंघातून नशीब अजमावले खरे पण, स्वकिरांनीच त्यांच्या विजयाचे काटे उलटे फिरवले म्हणे. दुसऱ्यांदा या मतदार संघाची चांगली तयारी केली असताना, विजय दृष्टिक्षेपात असताना थोरल्या पवारांच्या शब्दाखातर त्यांनी माघार घेतली. आणि पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला.
आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुक रिंगणात विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या बरोबरीने त्यांचे पुत्र सारंग पाटील यांच्या नावाचीही चर्चा शरद पवार राष्ट्रवादीकडून होत आहे. पण मूळचे पाटण तालुक्यातील मारूल चे व सध्या कराड स्थित असलेल्या या पिता- पुत्रांचा उमेदवारीला कराड पाटणच्या त्यांच्या पक्षातील नेतेच विरोध करत असल्याची चर्चा आहे.या नेत्यांनी आपली भूमिका थोरल्या पवारांच्या समोर मांडल्याचेही बोलले जात आहे.
खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतीच उभी फूट पडली आहे. अशावेळी वय झाले असतानाही नव्या दमाने 'तुतारी' घेऊन लढणाऱ्या थोरल्या पवारांसाठी सातारा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे. अशावेळी शरद पवार राष्ट्रवादीतील ही खदखद चांगली आहे असे म्हणता येणार नाही. श्रीनिवास पाटलांना गतवेळी सर्वाधिक मताधिक्य देणाऱ्या कराड उत्तर मधून होणारा विरोध, पाटण मतदारसंघातील गुरगुरणारे 'सिंह' या सगळ्याचा मेळ थोरले पवार कसे घालणार? हे पहावे लागणार आहे.
पाटणकरांच्या विरोधाची संभाव्य कारणे ..
- पाटण बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही.
- सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतही स्वतः सत्यजितसिंह पाटणकर रिंगणात होते तेव्हाही श्रीवास पाटील यांनी जाहीर भूमिका घेतली नाही.
- पाटण मतदारसंघात निधी वितरित करताना समन्वय साधला गेला नाही.
बाळासाहेब पाटलांच्या विरोधाची संभाव्य कारणे
- कराड शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही.
- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही स्वतः आमदार बाळासाहेब पाटील निवडणूक रिंगणात उभे होते. त्यावेळीही श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट व जाहीर भूमिका घेतली नाही.
- कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात निधी टाकताना विचारात घेतले नाही.
खरं कारण काय असू शकतं?
माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना राजकीय वसा आणि वारसा आहे. पण असा कोणताही वारसा नसताना, प्रशासकीय सेवेत असणारे श्रीनिवास पाटील लोकसभेच्या रिंगणात आले अन खासदार झाले. एकदा नव्हे तर तब्बल ३ वेळा त्यांना लोकसभेची संधी मिळाली. ५ वर्षे सिक्कीमचे राज्यपालपदही त्यांनी भूषविले. या सगळ्या राजकीय प्रवासात त्यांचे आपोआप एक सत्ता केंद्र तयार झाले. पण आपल्या कार्यक्षेत्रात तयार झालेले दुसरे सत्ताकेंद्र कोणत्या राजकीय नेत्यांना आवडेल बरं!