जत : तालुक्यातील उटगी येथील बाळासाहेब चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या केली आहे. प्रशासनाकडून चुकीचे आरोप करून त्यांची विटंबना केली जात आहे. जिल्हा पोलिसप्रमुखांनी केलेले आरोप मागे घ्यावेत अन्यथा संपूर्ण राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते डॉ. विजय पाटील, डॉ. महेश भोसले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला. ते म्हणाले की, राज्याचे गृहमंत्रिपद हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चालविले जात आहे. त्यामुळे मराठा समाजाचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. जत येथील पोलिस निरीक्षक युवराज मोहिते यांनी चव्हाण आत्महत्या प्रकरणात प्रशासनाच्या दबावाखाली चुकीचे जाब-जबाब घेऊन वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे. त्यामुळे चुकीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. आत्महत्या व आरक्षण याचा संबंध नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामागे षड्यंत्र आहे, असा आरोप त्यांनी केला. आरक्षणासाठी चव्हाण यांनी आत्महत्या केली आहे, हे त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट होत आहे. ही चिठ्ठीच मृत्यूपूर्व जबाब आहे, असे गृहीत धरून शासनाने पुढील कारवाई करणे आवश्यक आहे. शवविच्छेदन अहवालात दारू पिऊन आत्महत्या नाही, असा उल्लेख असताना, दारू पिऊन चव्हाण यांनी आत्महत्या केली आहे, असे प्रशासन कसे काय म्हणत आहे, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. डॉ. विजय पाटील, डॉ. महेश भोसले, मच्छिंद्र बाबर, अनिल शिंदे, अरुण शिंदे, सुधीर चव्हाण, रणजित शिंदे यावेळी उपस्थित होते. शासनाकडून हेटाळणी : महाडिक मोबाईलवरून पत्रकारांशी बोलताना अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक म्हणाले, मराठा आरक्षणासाठी चव्हाण यांनी बलिदान दिले आहे. मात्र, शासन त्यांची हेटाळणी करीत आहे. त्यांचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. चुकीची माहिती माध्यमांना देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा आम्ही निषेध करीत आहोत.
बाळासाहेब चव्हाण यांची आत्महत्या आरक्षणासाठीच
By admin | Published: September 25, 2016 12:51 AM