लोकमत नेटवर्क
सातारा : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कोरोना महामारीमुळे परेशान आहे. जिल्ह्यातील लोकांची सोसण्याची मानसिकता संपलेली आहे. जिल्ह्याचे अर्थकारण कोरोनाने पूर्णत: मोडकळीस आणले. यंत्रणेतील दोषांमुळे आरोग्यदेखील धोक्यात आलेले आहे. एक घाव दोन तुकडे.. असे निर्णय घेण्याची क्षमता असणारे अजित पवारच या परिस्थितीवर नेमका उपचार शोधतील, अशी जनतेला आशा आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आज साताऱ्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहांमध्ये कोरोनाबाबतीत प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांचा ते आढावा घेणार आहेत. तो घेत असताना जिल्ह्यातील उद्योगपती, व्यापारी, खासगी नोकरदार, हातावर पोट असलेले नागरिक यांचा विचार केला जावा, अशी जनतेची अपेक्षा आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. मात्र तरीदेखील रुग्ण संख्या कमी व्हायला मार्ग दिसत नाही. उद्योगधंदे बंद आहेत, मोलमजुरी करणाऱ्यांना हातात पैसा मिळत नाही. व्यापाऱ्यांची कर्जे थकली आहेत, बँका त्यांच्याकडून व्याज आकारत आहेत, शेतमाल शेतातच कुजून जात आहे. या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील सगळीच व्यवस्था पूर्णपणे मेटाकुटीला आलेली आहे. त्यामुळे मंत्र्यांनी सारासार विचार करून जिल्ह्यासाठी निर्णय घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.
दुसऱ्या बाजूला आरोग्य यंत्रणा सैरभैर झालेली आहे. कोरोनाबरोबरच आता म्युकरमायकोसिस हा जीवघेणा आजार जिल्ह्यात घुसला आहे. या सर्व परिस्थितीला सामोरे जात असताना आरोग्य यंत्रणा तुटपुंजी पडते आहे. या बिकट परिस्थितीतच अनेक खासगी दवाखाने रुग्णांची लूटमार करीत असल्याने गोरगरीब जनता घरातच बसून मरणाची वाट बघते आहे. या जनतेला वाचविण्यासाठी आणि जिल्ह्याचे अर्थकारण सावरण्यासाठी मंत्र्यांनी निर्णय घ्यायला हवा, अशी जनतेची इच्छा आहे.
आरोग्य विभागाला पुरेसे कर्मचारी द्या.
सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीने अक्षरशः कहर माजवला आहे. गेल्या महिनाभरापासून दोन हजारांच्या वर रुग्ण सापडत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये एका वैद्यकीय तज्ज्ञाला तब्बल २० रुग्ण तपासावे लागत आहेत. यामध्ये इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ शकते. आता तरी आरोग्य विभागाला पुरेसे कर्मचारी द्यावेत.
औषधांचा साठा मुबलक का मिळत नाही?
जिल्ह्यातील शासकीय दवाखान्यात एकूण ६३ रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरू आहेत. मात्र औषधांचा तुटवडा आहे. अनेकदा ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही. औषधे वेळेवर मिळाली नाहीत तर रुग्णांचा जीव जातो. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात रोज ३०-४० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहेत. यातून बोध घेऊन जिल्ह्यात औषधांचा मुबलक साठा असणे आवश्यक आहे.
शासकीय महाविद्यालयाची वीट एकदाची रचा
सातारा जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. ५०० खाटांचे मोठे हॉस्पिटल आणि तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. मंत्रिमंडळ बैठकांमध्ये अनेकदा या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध केल्याची माहिती दिली जाते. मग आता घोडे कुठे अडले आहे, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय महाविद्यालयाची वीट एकदाची रचावी, अशी सातारकरांची भावना आहे.
जिल्ह्याबाहेरच्या लोकांना वाचवायला ते जिल्हे समर्थ आहेत
सातारा जिल्हा कोरोना महामारीच्या बाबतीत रेड झोनमध्ये आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबरोबरच मृत्यूदेखील वाढलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रशासन हतबल झाल्याचे पाहायला मिळते. जिल्ह्यातील लोकांचा जीव वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अजूनही जिल्ह्याच्या बाहेरील लोक सातारा जिल्ह्यात येऊन उपचार घेत आहेत. अशा वेळी शासकीय दवाखान्यांमध्ये जिल्ह्यातील लोकांना बेड उपलब्ध होत नाहीत. यातदेखील मंत्र्यांना लक्ष घालावे लागेल.