सातारा : शहरातील विविध ठिकाणी असलेल्या झोपड्यांमध्ये उघड्यावर राहणाऱ्या अभागी चिमुरड्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी विविध व्यावसायिक, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, शालेय विद्यार्थ्यांबरोबरच आता प्ले ग्रुपमधील चिमुकल्यांनीही ऊबदार कपडे गोळा केले आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला सातारकरांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत असून यामध्ये महिलांचा पुढाकार वाखाणण्याजोगा आहे. त्याचबरोबर या मदतकार्यात आता बच्चेकंपनीही मागे राहिली नसून मुलांनी एकत्र येऊन कपडे जमविले आहेत. शाहूपुरी येथील ‘फन टाईम प्ले ग्रुप’च्या चिमुकल्यांनी झोपड्यांमधील अभागी मुलांसाठी मदत जमविली आहे. सदर बझार येथील स्वरूप कॉलनीतील महिलांच्या ग्रुपनेही मदतीचा हात देत कपडे गोळा केले आहेत. सातारा शहरासह कराड शहरातूनही मदतीचा ओघ सुरू आहे.सातारा शहरातील ज्या कुटुंबांनी मदतीसाठी कपडे बाजूला काढून ठेवली आहेत ती नेण्यासाठी काही युवकांनी काम सुरू केले आहे. (लोकमत टीम)..