पुसेगाव : निढळ (ता. खटाव) परिसरात सुमारे दीड तास दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला. निढळ परिसरात शनिवारी दुपारी साडेचारच्या आसपास मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे चिंतातुर बळीराजा सुखावला.
गत महिन्यात हवामानाच्या अंदाजानुसार माॅन्सून मुंबईत धडकला, अशा बातम्या आल्याने पुन्हा पाऊस पेरणीसाठी सुटी देईल का नाही, या भीतीने गेल्या दहा-पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी सोयाबीन, घेवडा, वाटाणा आदी खरीप हंगामातील पिकांची पेरणी बऱ्यापैकी उरकली; मात्र पिके उगवून आल्यानंतर उन्हाचा तडाखा वाढल्याने कोवळ्या पिकांनी अक्षरशः मान टाकली.
दुबार पेरणीचे सावट शेतकऱ्यांवर असतानाच दडी मारलेल्या पावसाने शेतकरी पेरण्या होऊन पिके उगवून आली तरी रिमझिम पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला होता. उगवून आलेल्या कोवळ्या पिकांनी कडक उन्हात माना टाकल्याने शेतकरी वर्गात दुबार पेरणीचे संकट येते की काय, अशी भीती व्यक्त होत होती. त्याचप्रमाणे अनेकांनी या आठवड्यात वृक्षारोपणही केले आहे. त्या झाडांनासुद्धा पाण्याची गरज होती, ती या पाण्याने काही प्रमाणात भागली आहे. दिवसभर खूप उकाडा जाणवत होता. व संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास दमदार हजेरी लावणारा पाऊस तब्बल दीड तास पडला. त्यामुळे आता या भागातील दुबार पेरणीचे संकट सध्या तरी टळले असल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे.