मसूर : रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने जमिनीचा पोत टिकवण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी हेळगाव भागातील अनेक शेतकऱ्यांनी शेतात हिरवळीची खताची पिके घेतली आहेत. ती पिके शेतीला उपयुक्त ठरू लागली आहेत. त्यामुळे ताग, ढेंचा आदी हिरवळीची पिके घेण्याकडे कल वाढला आहे.
जमिनीला सेंद्रिय खताची गरज भागवण्यासाठी हिरवळीची खते हा उत्तम पर्याय असल्याने याची लागवड अनेक शेतांत दिसून येत आहे.
जमिनीची मशागत करण्यासाठी घरोघरी असणाऱ्या बैलाच्या जोड्यांची जागा यंत्राने घेतली. पशुपालन कमी झाल्याने व दुग्ध व्यवसाय अडचणीत आला. घरोघरी जनावरांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जमिनीला शेणखत मिळणे दुरापास्त झाले आहे. रासायनिक खतांचा भरमसाट वापर वाढल्याने जमिनीची सुपीकता कमी होऊन जमीन नापीक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी हिरवळीच्या खताकडे वळू लागले आहेत.
कऱ्हाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा ताग, ढेंचा आदी हिरवळीची पिके घेतली आहेत. सेंद्रिय किंवा कंपोस्ट खताची उपलब्धता कमी झाली आहे. शेतात वारंवार पिके घेतल्याने सेंद्रिय कर्बाची व नत्राची कमतरता दिसून येते. अशा परिस्थितीत हिरवळीची पिके उपयुक्त ठरू लागली आहेत. त्यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ताग व ढेंचा या हिरवळीच्या पिकांना प्राधान्य दिले आहे. ताग हिरवळीचे उत्तम पीक असून सर्व प्रकारच्या जमिनीत हे चांगल्या पद्धतीने उगवते. पेरणीनंतर पाच ते सहा आठवड्यांनी हे पीक फुलोऱ्यात येते. त्या वेळी शेताच्या केलेल्या नांगरटीच्या साह्याने हे पीक जमिनीत गाडून टाकले जाते. ही प्रक्रिया रिकाम्या शेतात साधारणपणे मार्च ते मे दरम्यान पूर्ण केली जाते. जूनमध्ये पेरणी करताना किंवा उसाची लागण करताना इतर खतांची गरज कमी प्रमाणात भासते. जमिनीत गाडलेले हे हिरवळीचे खत पिकासाठी उपयुक्त ठरत आहे.
कोट
भरमसाट रासायनिक खतांचा डोस कमी होण्यासाठी व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी त्या जमिनीत ताग व ढेंचा या पिकांची लागवड करून जमिनीला कर्ब व नत्राचा पुरवठा होण्यासाठी हिरवळीची खते उपयुक्त ठरत आहेत. याकडे जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी वळावे.
– शिवाजीराव सूर्यवंशी,
प्रगतशील शेतकरी, हेळगाव
फोटो :
कऱ्हाड तालुक्यातील हेळगाव येथे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत घेतलेले ताग पीक फुलोऱ्यात आले आहे. (छाया : जगन्नाथ कुंभार)