फलटण : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व पोंभुर्ले ग्रामपंचायत, जांभे देऊळवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथीला सोमवार, दि. १७ रोजी पोंभुर्ले येथील ' दर्पण ' सभागृहात दरवर्षीप्रमाणे होणारा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लागू असणाऱ्या निर्बंधांमुळे साध्या पद्धतीने होणार आहे. जांभे-देऊळवाडी येथील ज्येष्ठ नेते शांताराम गुरव, सरपंच सादिक डोंगरकर व देवगड तालुका शिवसेना प्रमुख अॅड. प्रसाद करंदीकर यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी दिली.
दरम्यान, बाळशास्त्री जांभेकरांच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी पुण्यतिथीच्या निमित्ताने हे वर्ष महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे ‘पत्रकार प्रबोधन’ वर्ष म्हणून विविध कार्यक्रमांनी होणार आहे. त्याचा एक भाग म्हणून १७ मे २०२१ रोजी राज्यातील सर्व मराठी वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे यांची कार्यालये, शिक्षणसंस्था व वाचनालये, सार्वजनिक संस्था यामधून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्रास आदरांजली वाहून या ‘पत्रकार प्रबोधन’ वर्षाचा शुभारंभ कोरोनाचे सर्व शासन निर्देश पाळून करावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.