कवठे : लग्नाच्या वाढदिवशी घरगुती अपघातात प्राण गमवावे लागण्याचे दुर्दैव येथील विजय नरहरी क्षीरसागर (गुरव) (वय ३८, रा. कवठे, ता. वाई) यांच्या वाट्याला आले. पाणी तापवत असताना वाफ आणि गरम पाणी तोंडावाटे श्वासनलिकेत जाऊन त्यांचा मृत्यू झाला.याबाबत माहिती अशी : आज सकाळी विजय गुरव हे पहाटे उठून घरासमोर कॉईल असलेला पाण्याचा बंब पेटविण्याचा प्रयत्न करीत होते. या बंबात कॉईलच्या वरच्या भागात कागद पेटते ठेवले असता आतून पाणी फिरवले की लगेचच तापलेले पाणी खालील बाजूने बाहेर येते. तथापि, पाणी बाहेर येईना, हे लक्षात आल्यावर त्यांनी बंबाच्या खालील बाजूस रबरी पाईपचा छोटासा तुकडा जोडला व तोंडाने हवा ओढण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी पाईपमध्ये अडकलेला कचरा निघाला व वाफेसह गरम पाणी जोराने क्षीरसागर यांच्या तोंडात गेले. त्यामुळे त्यांच्या श्वासनलिकेला इजा झाली.विशेष म्हणजे, हा प्रकार घडल्यानंतर ते स्वत: आपल्या चारचाकी वाहनाने वाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यास गेले; परंतु श्वासनलिकेला आतून झालेली इजा एवढी वाढली की त्यांना श्वास घेणे अशक्य झाले व उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. ते वाई येथील एका पतसंस्थेत काम करीत होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने कवठे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
बंबाचे पाणी तोंडाने ओढणे जिवावर बेतले
By admin | Published: February 11, 2015 11:08 PM