सातारा : सातारा जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल संलग्न मेडिकल व डिस्ट्रिब्युटर्स यांच्याकडे प्राप्त होणारा ॲक्टिमेरा इंजेक्शनची विक्री व वितरण जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांच्या लेखी परवानगीखेरीज करण्यात येऊ नये, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा रामचंद्र शिंदे यांनी दिले आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांनी सदरचे इंजेक्शन हे कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खासगी रुग्णालयास इंजेक्शनचे शुल्क आकारणीच्या अनुषंगाने शासनाने निर्धारित करून दिलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून वितरित केले जाईल, तसेच कोविड हॉस्पिटल संलग्न मेडिकल वितरक, डिस्ट्रिब्युटर्स यांच्याकडे उपलब्ध होणाऱ्या ॲक्टिमेरा इंजेक्शनच्या साठ्याबाबतची माहिती सहा. आयुक्त, अन्न औषध प्रशासन, सातारा आणि जिल्हा शल्यचिकित्सक सातारा यांना दररोज उपलबध करून द्यावी.