- प्रशांत रणवरे
जिंती : व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ किर्तनकार व प्रवचनकार युवक मित्र ह.भ.प. प्रकाश सदाशिव जंत्रे उर्फ बंडा तात्या कऱ्हाडकर यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आल्याने गुरुवार दि. १२ रोजी सकाळी ७ वाजता त्यांना येथील निकोप हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते, उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे, तथापि काही वैद्यकिय चाचण्या व अधिक उपचारांसाठी त्यांना पुणे येथे हलविण्यात आले आहे.
बुधवारी वडूज आणि पुणे येथे किर्तन करताना त्यांना थोडा त्रास जाणवला परंतू किरकोळ औषधे घेऊन त्यांनी पुण्यातच मुक्काम केला आणि सकाळी पिंप्रद येथे पोहोचल्यावर त्यांची प्रकृती ठीक वाटत नसल्याने त्यांचा विरोध असतानाही तेथील अनुयायांनी त्यांना फलटण येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. निकोप हॉस्पिटल मध्ये प्रख्यात हृदय रोगतज्ज्ञ डॉ. जे. टी. पोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरु केले.
विविध वैद्यकिय तपासण्या केल्यानंतर उपचाराची दिशा निश्चित झाल्याने काल दिवसभर योग्य पद्धतीने उपचार केल्यानंतर ह.भ.प. बंडा तात्यांची प्रकृती सुधारली, रात्री त्यांना झोपही चांगली लागली, मात्र सकाळी पुन्हा पक्षाघाताचा दुसरा झटका आल्याने त्यांना अधिक तपासण्या व अधिक उपचारांसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. ह.भ.प. बंडा तात्या यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. जे. टी. पोळ यांनी सांगितले आहे.
गुरुवार रोजी सकाळी ६ वाजता आमच्या हॉस्पिटल उपचारासाठी दाखल झाले. त्यांच्या सर्व तपासण्या केल्या असता त्यांना अर्धांग वायूची लक्षणे दिसून आल्याने प्रकृती स्थिर झाल्यानंतर पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.- डॉ. जे.टी. पोळ फिजिशन,फलटण