सातारा : किराणामाल दुकानांमध्ये वाइन विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या निर्णयाविरोधात वारकरी संप्रदायाचे प्रमुख मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात राज्य सरकारवर आंदोलन करून तीव्र स्वरूपात आसूड ओढले. शासनाचे वाइन धोरण म्हणजे ‘ढवळ्याशेजारी बांधला पावळ्या.. वाण नाही पण गुण लागला'' असे आहे, त्यातला ढवळ्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्यांना त्यांचा जास्त गुण लागला ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.. असे म्हणत कराडकर यांनी शासनाच्या वाईन धोरणाचा समाचार घेतला.राज्य शासनाच्या वाईन विक्री धोरणाविरोधात व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांचे गुरुवारी साताऱ्यात दंडुका दंडवत आंदोलन झाले. या आंदोलनावेळी कराडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.बंडातात्या म्हणाले की, शासनाच्या डोळ्यावरील धुंदी उतरण्यासाठी वारकरी संप्रदाय आंदोलन सातत्याने करत राहील, याची गंभीर दखल राज्य शासनाने घ्यावी. वाईन विक्रीचे धोरणात्मक निर्णय अजित पवार यांचे आहेत. ते म्हणजे ढवळा असून त्यांच्या जोडीने काम करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पवळ्या आहेत. निर्णय अजित पवारांनी घ्यायचा आणि तो मुख्यमंत्र्यांनी राबवायचा, हे आजपर्यंतचे महाविकास आघाडीचे धोरण आहे. मात्र आम्ही महाराष्ट्र राज्य यांच्या आहारी जाऊन देणार नाही.दरम्यान, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांच्या वतीने गुरुवारी पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान दंडवत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल पोलिसांनी घेऊन प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.व्यसनमुक्त युवक महाराष्ट्र संघाचे अध्यक्ष विलासबाबा जवळ आणि त्यांचे सहकारी बुधवारी रात्रीच साताऱ्यात दाखल झाले होते. सकाळी दहा वाजल्यापासून पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून या आंदोलनाला सुरुवात झाली.पोलिसांनी पहिल्या टप्प्यातच वारकऱ्यांना विनंती करून त्यांच्याकडील दंडुके काढून घेण्याची प्रक्रिया केली. व्यसनमुक्त संघाच्या आंदोलकांनी या विनंतीला मान देऊन आणलेले दंडुके पोलिसांच्या हवाली केले. दारू विक्रीच्या निर्णयाला विरोध करत वारकऱ्यांनी पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर दंडवत घातले.
दारू विक्री करणारी किराणा दुकाने जाळू : कराडकरजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंडातात्या कराडकर यांनी शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध केला. शेतकऱ्यांच्या मालाची इतकी काळजी असेल तर द्राक्ष आणि तत्सम फलोत्पादन यांचा शालेय पोषण आहारात समावेश करावा. दारूविक्री माता-भगिनी आणि महिलांचे संसार धुळीला मिळाले आहेत तर शासनाने हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही तर गावागावातील वारकरी ते दुकान जाळल्याशिवाय राहणार नाहीत याची गंभीर दखल घ्यावी, असा इशारा बंडातात्या कराडकर यांनी दिला.
त्या माजी मंत्र्याच्या मुलाचा दारू पिऊन मृत्यू
दारू पिणारी आमदार, मंत्र्यांची अनेक पोर आहेत. भल्याभल्या मंत्र्यांनी पोर अशी कितीतरी उदाहरणे येथील एका काँग्रेस नेत्याच्या मुलाचा दारू पिल्यामुळेच अपघातात मृत्यू झाला होता. असा खळबळजनक दावा देखील बंडातात्यांनी केला आहे.