लोकमत न्यूज नेटवर्क
मायणी : खटाव तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आयसोलेशन सेंटर उभे केले आहे. यातील रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी व देखभालीसाठी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिक्षकांची नेमणूक केलेली असते. रात्रभर कोणीच नसल्याने सुरक्षा रामभरोसे आहे. त्यामुळे रुग्ण पळून जाण्याची घटना घडली. दुसऱ्या दिवशीही नऊ जणांपैकी दोघेजण मायणी आणि विटा येथे उपचारासाठी रुग्णालयात गेले आहेत, तर बाकीच्यांचा तपास लागला नाही.
याबाबत माहिती अशी की, मायणी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मायणी गाव व गावाच्या शेजारच्या वाड्यावस्त्यांवरील कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्थानिक कोरोना कमिटीच्या माध्यमातून आयसोलेशन सेंटर उभे करण्यात आले आहे. या आयसोलेशन सेंटरमधून शुक्रवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास सेंटरमध्ये असलेले नऊ रुग्ण निघून गेले होते. या ठिकाणी रात्रीच्या वेळी कोणीही जबाबदार व्यक्ती या आयसोलेशन सेंटरवर उपस्थित नव्हता, असे सकाळी समोर आले.
याबाबत माहिती घेतली असता या आयसोलेशन सेंटरसाठी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठराविक वेळेसाठी एका एका शिक्षकाची नेमणूक केली आहे. दिवसा शिक्षक आपली जबाबदारी यशस्वी पार पाडत आहेत. मात्र रात्रीच्या वेळी या सेंटरमध्ये उपचारासाठी किंवा विलगीकरण झालेल्या रुग्णांच्या सुरक्षेसाठी कोणीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्यामुळे हे रुग्ण रात्रीच्या वेळी आयसोलेशन सेंटरमधून निघून गेले.
त्यामुळे या आयसोलेशन सेंटरची जबाबदारी कोणाची, सायंकाळी सहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत कोण जबाबदारी घेणार? यासाठी स्थानिक कोरोना कमिटीने कोणाची नेमणूक केली आहे, येथे एका जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करणे गरजेचे आहे, असे अनेक प्रश्न मायणीतील शुक्रवारच्या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत.
चौकट
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. बाधित रुग्णांनी स्वतःबरोबर समाजाची काळजी घेणे गरजेचे आहे. बाधित रुग्णांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही जबाबदार राहणे आवश्यक आहे.
चौकट
बहुतांश गावांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये दिवसा शिक्षक व रात्रीच्या वेळी कोणीही नाही अशी काहीशी परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व ठिकाणीच्या आयसोलेशन सेंटरमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक किंवा जबाबदार व्यक्ती ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.