म्हसवड : सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाने डोके वर काढल्याने बाराबलुतेदारांचे विविध व्यवसाय, उद्योग- धंदे बंद असल्याने उपासमार सुरू आहे. बारा बलुतेदारांपैकी एक बांगडी व्यवसायावर उपजीविका करणाऱ्यांवर तर कोरोनाने कुऱ्हाड कोसळली आहे. हातावरचे पोट असणारा बांगडी भरणारा कासार सध्या हलाखीचे जीवन जगत आहे. एकीकडे पोट भरायची चिंता तर दुसरीकडे कोरोनाची भीती या दुहेरी संकटात हे सापडले आहेत.
कोरोना संसर्गामुळे जगावर संकट कोसळले असून गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली जनता भरडली जात आहे. सर्व सण उत्सव सार्वजनिक कार्यक्रम यासह लग्नसमारंभ यावर शासनाने बंदी घातल्याने अनेक बाराबलुतेदारांचे उद्योग धंदे बंद आहेत. एप्रिल, मे या दोन महिन्यांत लग्नसराई मोठ्या प्रमाणात असते; पण सलग दुसऱ्या वर्षीही या दोन महिन्यांतच कोरोनामुळे हा हंगाम झालेला नाही. लग्नसराईत दोन तीन महिने व्यापार करून बाकीच्या काळात बऱ्यापैकी व्यवसाय नाही झाला तरी आपले व कुटुंबाचा उदरनिर्वाह वर्षभर उत्तम प्रकारे होत होता.
लग्नकार्यात बांगडी भरूनच लग्न कार्याची मुहूर्तमेढ रोवल्यावरच खऱ्या अर्थाने लग्नसोहळ्याची सुरुवात होते; पण दोन वर्पांसून हे सोहळेही सोशल डिस्टन्सिंगमुळे कमी गर्दीत करून मोजक्या नातेवाइकात पार पाडण्याचे शासनाचे आदेश असल्यामुळे लग्न समारंभ होत आहेत; पण बाकी रीतीरिवाजाला डामडौलाला फाटा देऊन त्यामुळे अनेक व्यावसायिकांच्या पोटावर पाय आला आहे. यामध्ये बांगडी, बँडवाले, घोडे, मंडपवाले, सजावट करणारे, फोटोग्राफर, भांडी फर्निचर, पार्लरवाले, चप्पल व्यसायिक, सौंदर्य प्रसाधने लेडीज शाॅपी व इतर व्यावसायिक व्यवसाय बंद असल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
चौकट
कसे राखणार अंतर
सोशल डिस्टन्सिंग पाळून अनेक व्यवसाय सुरू असून ते करता येण्यासारखे आहेत; पण बांगडी हा व्यवसाय असा आहे की तो सोशल डिस्टन्सिंग पाळून करता येणे शक्य नाही. ग्राहकाला बांगड्या भरायच्या म्हटलं तर जवळून संपर्क येतोच. त्यामुळे सोशल डिस्टन्सपाळता येत नाही. कोरोनापासून संरक्षण करून हा व्यवसाय करणे म्हणजे या व्यावसायिकांना एक दिव्यच आहे.
कोट
बांगडी व्यवसाय हा कोरोनापासून संरक्षण पाळण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना पाळून जसे सामाजिक अंतर पाळून, हँडग्लोज वापरून बांगडी व्यवसाय करता येणे शक्य नाही. यामुळे एक तरी कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी व्यवसाय बंद ठेवणे हाच एकमेव पर्याय आहे. तरी शासनाने बांगडी व्यावसायिकांना आर्थिक मदत द्यावी, तरच हा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांना मदत होईल व जगू शकतील.
सुनीता कासार,
म्हसवड