वरकुटे मलवडी : माण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात बनगरवाडी (वरकुटे मलवडी) ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कारभारात सुधारणा न झाल्यास दि. ११ रोजी शाळेला टाळे ठोकण्यात येऊन शाळेसमोरच उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, बनगरवाडी येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. येथे गेल्या तीन महिन्यांपासून मुख्याध्यापकपदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी पदवीधर शिक्षकास वेठीस धरण्यात येत आहे. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मुख्याध्यापक पदाचा पदभार सेवा ज्येष्ठतेनुसार देणे गरजेचे आहे. तो पदभार एका शिक्षिकेकडे जात आहे. मात्र, गटशिक्षणाधिकारी वामनराव जगदाळे हे संबंधित शिक्षिकेस पाठीशी घालीत आहेत. आता एका शिक्षकाला मुख्याध्यापक पदाचा कार्यभार दिला आहे, तो त्यांच्या मनाविरोधात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. ग्रामस्थांत आणि पालकांत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदाचा कार्यभार संबंधित शिक्षिकेकडे न दिल्यास आंदोलनाचा निर्णय घेण्यात येणार आहे, असेही निवेदनात स्पष्ट केले आहे. निवेदत देताना सदाशिव बनगर व बनगरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर) ठरावांचा अनादर... बनगरवाडी ग्रामस्थांनी ग्रामसभेत तसेच शाळा व्यवस्थापन समितीनेही अनेकवेळा यासंबंधी ठराव केला आहे. मात्र, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याचा अनादर झाला आहे, असा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात बनगरवाडी ग्रामस्थांचे आंदोलन
By admin | Published: January 29, 2015 9:11 PM