बनवडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन हात पंपाद्वारे सोडियम हायपो क्लोरिंगची फवारणी केली जात आहे. सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कोठावळे, नरहरी जानराव, योगेश गोतपागर आदी त्यासाठी परिश्रम घेत आहेत. तसेच कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या घराचा परिसर बंद केला आहे. अंगणवाडीसेविका, आशासेविका व आरोग्य विभागाकडून माहिती घेऊन उपयोजना केल्या जात आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोफत व्हिटॅमिनच्या गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. बाधितांच्या संपर्कात असलेल्यांनाही आवश्यक ती औषधे दिली जात आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणारे आणि मास्क न वापणाऱ्यांवर कारवाई केली जात असून, आतापर्यंत १० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी दररोज सकाळी घंटागाडीच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे. ग्रामपंचायतीच्या या कामाला ग्रामस्थांकडून प्रतिसाद मिळत आहे.
फोटो : २५केआरडी०२
कॅप्शन : बनवडी, ता. कऱ्हाड येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फवारणी करण्यात आली. यावेळी सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.