सातारा : जिल्ह्यात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आलेला आहे. शुक्रवार व शनिवार असे सलग दोन दिवस ४० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याने धोका वाढलेला आहे.
जिल्ह्यात काही दिवसांपासून वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला कायम दुष्काळी समजण्यासाठी वाठार स्टेशनच्या परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी गारांचा खच साचलेला होता. गुरुवारी सातारा शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे वीज पुरवठा अनेकदा खंडित झाला.
आता शुक्रवार दि. ३० एप्रिल व शनिवार दि. १ मे असे सलग दोन दिवस तीव्र वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या वादळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रति तास असा असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती आहे या परिस्थितीमध्ये नागरिकांनी रस्त्यावर न फिरता घरात बसून राहणे अपेक्षित आहे.
या वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून विजेचे खांब, तारा तसेच मोठी झाडेदेखील वादळी वाऱ्यात कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी कडब्याच्या गंज्या लावून ठेवल्या आहेत. अनेक ठिकाणी टोमॅटोसारखी पिके उभी आहेत. अनेक ठिकाणी झाडाला अजूनही आंबे आहेत. कारले, दोडका, द्राक्षे यांचे वेलदेखील उभे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.