कऱ्हाड : संशयिताच्या मृत्यू प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल झालेले बारा पोलिस अद्याप गायब आहेत. संबंधित पोलिसांचे मोबाईलही बंद असून, ‘सीआयडी’चे पथक ठिकठिकाणी तपास करीत आहे. यात आत्तापर्यंत फक्त एकाच अटक झाली आहे.कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दाखल असणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी करमाळा येथील रावसाहेब जाधवला ताब्यात घेतले होते. रावसाहेबसह त्याचा मेहुणा अनिल डिकोळे हा सुद्धा पोलिसांच्या ताब्यात होता. पोलिस त्या दोघांकडे तपास करीत असताना कार्वेनाका पोलिस चौकीत रावसाहेबची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबत अनिल डिकोळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिस निरीक्षक विकास धस, सहायक पोलिस निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. रावसाहेबच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केलेल्या अहवालातही त्याच्या शरीरावर मारहाण झाल्याचे व्रण आढळले आहेत. दोन्ही वस्तुस्थितीनुसार ‘सीआयडी’ने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलिस अधीक्षकांनी संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली. तेव्हापासून संबंधित अधिकारी व कर्मचारी गायब आहेत. या प्रकरणाचा ‘सीआयडी’कडून कसून तपास सुरू आहे. गेले काही दिवस या पथकाने मृत रावसाहेबसह कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. तसेच गायब पोलिसांच्या घरावर छापा टाकला. मात्र, कोणीही पथकाच्या हाती लागले नाही. शनिवारी (दि. १६) या प्रकरणात शहर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल कृष्णा खाडेला अटक केली. त्याच्याकडे याप्रकरणी कसून तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)कृष्णा खाडेला न्यायालयीन कोठडीरावसाहेब जाधवच्या खूनप्रकरणी ‘सीआयडी’ने अटक केलेल्या कॉन्स्टेबल कृष्णा खाडे याला गेल्या शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
कऱ्हाडचे बारा पोलिस अद्यापही गायब!
By admin | Published: July 23, 2016 11:21 PM