राज्य शासनाने आठवड्यातील दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीही नवीन आदेश दिले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ मंगळवारपासून बंद ठेवण्यात आली आहे. शुक्रवार ते सोमवारपर्यंतचा लॉकडाऊन आणि इतर दिवशी बाजारपेठ बंद राहणार असल्यामुळे शहरात पोलिसांनी बॅरिकेड टाकून रस्ते अडविले आहेत. मंगळवारी सकाळीच बहुतांश रस्त्यावर अडथळे निर्माण करण्यात आले. अचानक बॅरिकेड लावल्यामुळे वाहनधारकांची कसरत झाली.
शहरातील पोपटभाई पेट्रोल पंपासमोर, शाहू चौक, दादा उंडाळकर चौक याठिकाणी बॅरिकेड लावण्यात आले आहेत. पोपटभाई पेट्रोल पंपासमोर शहरात जाणारा एकेरी मार्ग पूर्ण बंद करण्यात आल्याने शहरात जाणारी वाहने भेदा चौक, ईदगाह मैदान मार्गावरून जात होती; तर याच ठिकाणी बॅरिकेड पूर्ण न काढता अर्धवट स्थितीत ठेवल्याने वाहने बराच वेळ थांबून राहत होती. तसेच कोल्हापूर नाका ते पोपटभाई पंपादरम्यान वाहनांच्या रांगा लागत होत्या. दत्त चौकातून शाहू चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर पंचायत समितीनजीक बॅरिकेड लावल्यामुळे पंचायत समिती, प्रशासकीय कार्यालय व शाहू चौक, जुन्या पुलाकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी होऊन मोठी कोंडी होत आहे. सुपर मार्केट येथून संभाजी मार्केटकडे येणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
फोटो : ०६केआरडी०६
कॅप्शन : कऱ्हाडातील प्रमुख रस्ते पोलिसांनी मंगळवारपासून बॅरिकेड लावून रोखले आहेत.