लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : वातावरणात बदल झाल्याने डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढल्याने त्रास होऊन ताप येऊन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या काळात डेंग्यू, चिकनगुनिया व मलेरियासारखे आजार डासांमुळे उद्भवतात. काहीही करून डास पळाले पाहिजेत, यासाठी अनेक उपाययोजना लोकांमधून होत असल्याचे दिसून येत आहे.
या काळात आजारांपासून लांब राहण्यासाठी चांगला पर्याय म्हणजे डासांना घरात येऊ न देणे. कॉइल, मॅट, रिपेलेंटस किंवा लिक्विड आदींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे अनेकांना श्वसनाचे विकार सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. तुळस, पुदीना, झेंडू आदी आपल्या अंगणात लावल्यास डासांपासून मुक्ती मिळते, असे जाणकारांचे मत आहे.
खोबरेल तेल व कडूनिंबाचे तेल एकत्र करून लावल्यास डासांपासून संभाव्य होणारे आजार टाळता येतात. लिंबाचं आणि निलगिरी तेलाचे मिश्रण अंगावर लावल्यास शरीर निरोगी राहते. कापूर जाळल्याने जास्त फायदा होतो, तसेच कडूनिंबाचे तेल व कापूर यांचे मिश्रण करून स्प्रे रात्री झोपण्यापूर्वी घरभर फवारल्यास डास घरातून पळून जातील. लसणाच्या पाकळ्या पाण्यात टाकून चांगल्या उकळल्यावर हे पाणी घरात शिंपडल्यास लसणाच्या तिखट वासाने घरात डास थांबत नाहीत. सरसोच्या तेलात ओव्याची पूड मिसळून दिवा लावल्यास डास दूर पळतात. सध्या अशाप्रकारचे घरगुती उपाय घरोघरी सुरू झाले आहेत.
प्रतिक्रिया
वास्तविक डास हे साचलेल्या गोड्या पाण्यावरच तयार होत असतात. निसर्गालाही हानिकारक ठरत असलेल्या ‘वापरा आणि फेका’ या ग्लासांमुळे डासांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काही वनस्पतींच्या पानांचा, तेलाचा अथवा सुगंधाचा वापर झाल्यास डास मानवाजवळ येत नाहीत. यामध्ये प्रामुख्याने तुळस, कडूनिंब, निरगुडी, झेंडूसह आदी वनस्पतींची लागवड आरोग्याला पोषक वातावरण तयार करते, तसेच गप्पी मासे यांचे प्रमुख अन्न डासांची अंडी असल्याने त्या डासांची उत्पत्ती होत नाही. वनस्पतीसह गप्पी मासे या डासांवर तात्पुरते उपाय आहेत.
- प्रा. सोहन मोहळकर,
वनस्पतीशास्त्र.