वडूज : खटाव तालुक्यातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे प्राणवायूकरिता आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. बहुतांश रुग्णालयांनी महसूल प्रशासनाकडे धाव घेतली. ऑक्सिजनसाठी प्रांताधिकारी जर्नादन कासार व तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिवसरात्र एक करून खासगी वेल्डिंग दुकानदार व साखर कारखानदारांकडून सुमारे ५१ टाक्या अल्पावधीत गोळा केल्या.
त्या टाक्या तातडीने लोणंद व सातारा या प्लांटकडे रवाना केल्या. त्यामुळे मध्यरात्री उशिरापर्यंत जागे राहून महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना खटाव तालुक्यातील आणीबाणी परिस्थिती टळली. त्यामुळे ऑक्सिजनसाठी महसूल खातेही सतर्क असल्याचे दिसून आले.
खटाव तालुक्यातील वडूज ५, निमसोड २, पुसेसावळी ४, वाकळवाडी ३, पुसेगाव ९, औंध ६, बुध २, गोपूज १, पडळ साखर कारखाना २०, घाटमाथा साखर कारखाना येथून ऑक्सिजन गॅस टाक्या महसूल प्रशासनाने गोळा करून वडूज तहसील कार्यालयात जमा केल्या. त्यानंतर डॉ. संतोष मोरे व डाॅ. सम्राट भादुले यांनी या गॅस टाक्यांचे ऑडिट केले. त्यानंतर महसूल विभागाने या टाक्या ऑक्सिजन भरण्यासाठी लोणंद व सातारा प्लांटकडे रवाना केल्या. सातारा व लोणंद प्राणवायू निर्मिती केंद्रांवर देखरेखीसाठी तीन महसूल कर्मचारी तैनात केले आहेत.
सोमवारी दिवसभरदेखील संबंधित अधिकारी प्राणवायू वाटपात गुंतून राहिले, तर ऑक्सिजनच्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी राहुल झितकर यांच्याकडे नियोजन आहे. नायब तहसीलदार सीताकांत शिर्के यांच्याकडे टाक्या जमा करून प्राणवायूनिर्मिती केंद्रांकडे टाक्या रवाना करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महसूल विभागाने प्राणवायूसाठी केलेली धडपड वाखाणण्याजोगी आहे. कितीतरी बाधित रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी त्यांची धडपड अविरत सुरूच आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या या आणीबाणी काळातील प्राणवायूसाठी दिसणारी तगमग प्रकर्षाने जाणवते. त्याचप्रमाणे तालुक्यातील होम आयसोलेशन सेंटरला भेटी देणे आणि नव्याने सुरू होत असलेल्या ऑक्सिजन बेड सेंटरला प्राणवायू उपलब्ध करून देणे, ही तारेवरची कसरत सध्या महसूल विभाग सांभाळत आहे.
चौकट
मुख्याधिकारीही कार्यरत...
ऑक्सिजनसाठी बाधित रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी धावपळ लक्षात घेऊन महसूल विभागाने प्राणवायूसाठी कंबर कसली आहे. यामध्ये वडूज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर हेदेखील वडूजमधील गॅस टाक्या उपलब्धतेसाठी कार्यरत आहेत.
फोटो
०८वडूज-ऑक्सिजन
खटाव तालुक्यातील रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडल्यामुळे खासगी दुकानांतून सिलिंडर महसूल विभागाने जमा केले आहेत.