सातारा : ‘आपला सातारा स्वच्छ, सुंदर, हरीत, सुरक्षित आणि दहशतमुक्त करण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे,’ असे मत नगरविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वेदांतिकाराजे भोसले यांनी व्यक्त केले. प्रभाग ११ मधील प्रचाराच्या पदयात्रेदरम्यान त्या बोलत होत्या. वेदांतिकाराजे म्हणाल्या, ‘माझी उमेदवारी ही सातारा शहरातील प्रत्येक महिलेची, नागरिकाची उमेदवारी आहे. पालिका सत्तेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम आणि शहराचा विकास अधिक गतिमान झाला पाहिजे. नागरिकांना पालिकेत आपली स्वत:ची सत्ता आहे, असे वाटले पाहिजे.’ दरम्यान, वेदांतिकाराजे या प्रत्येक प्रभागातील उमेदवारांना आणि प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन घर टू घर भेट देत आहेत. तसेच मतदारांशी संवाद साधत आहेत. मतदारांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्यानंतर वेदांतिकाराजे आपली आणि नगरविकास आघाडीची भूमिका नागरिकांपुढे विषद करत आहेत. रविवारी सकाळी वेदांतिकाराजे यांनी प्रभाग क्र. ११ मध्ये घर टू घर भेट देऊन प्रचार केला. यावेळी आघाडीचे उमेदवार जयेंद्र चव्हाण, अरुणा पोतदार यांच्यासह सतीश सूर्यवंशी, जितेंद्र मोहिते, दीपक भोसले, विजय देशमुख, आबा लोखंडे, नाना खैर, विलास कासार, बिपीन कासार, संदेश पिलके, मिलिंद घाडगे, दादा सपकाळ, योगेश भंडारी, भूषण पाटील, राजन भोसले, संजय परदेशी, राजन कोरडे, विनोद गोसावी, अमोल गोसावी, गणेश पवार आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दहशतमुक्त सातारासाठी रिंगणात :
By admin | Published: November 14, 2016 12:20 AM