सातारा : परकीय प्रदेश काबीज करण्यासाठी सेनापतीने राजधानी सोडावी, तर राज्याच्या राजधानीतच सैन्याने सेनापतींच्या अनुपस्थितीत तह करून शस्त्रे खाली ठेवावीत, अशीच ऐतिहासिक परिस्थिती सातारा शहरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळाली. ऐनवेळी शेजारच्या जावळीने साथ दिली नसती, तर विद्यमान आमदारांना राजकीय दग्याफटक्याला सामोरे जावे लागले असते. मात्र, जावळी जागली अन् त्यांच्यावरील संकटे टळली. पाच वर्षांपूर्वी मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर सातारा मतदारसंघाला जावळी तालुका जोडला गेला. सातारा तालुक्याचा काही भाग कऱ्हाड उत्तरला जोडला गेला, तर पूर्वेकडचा भाग कोरेगाव मतदारसंघाला जोडला गेला. सातारा शहर आणि आजूबाजूचा परिसर व संपूर्ण जावळी तालुका असा मतदारसंघ तयार झाल्याने अजिंक्यतारा कारखाना व इतर सहकारी संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रभुत्व राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांच्या वाट्याला गेले. सातारा शहर हा मनोमिलनाचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी दोन राजे सांगतील त्याप्रमाणे राजकारण फिरते. नगरपालिका निवडणुकीला मनोमिलनाविरोधात उभे राहिलेल्यांचा निभाव लागला नाही. अनेक वर्षे पालिकेची सत्ता ही राजघराण्याच्याच ताब्यात आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शहरातून ७५ टक्क्यांच्या वर मते उदयनराजे किंवा शिवेंद्रसिंहराजेंना मिळतात. शहरातून आमदारांना विरोध होऊच शकत नाही, जो काही विरोध असेल तो जावळीतून तिथेच फौजफाटा कामाला लावला गेला होता, असेही काहीजण सांगतात. याउलट दीपक पवारांशी असलेल्या नातेसंबंधांना जागून काहीनी त्यांचा आतल्या अंगाने प्रचार केल्याचे सांगितले जाते. शेजारच्या शाहूपुरीतीलही राजेंच्या कार्यकर्त्यांची गटबाजी धोकादायक ठरली. अनेक ठिकाणी शिवेंद्रराजेंपेक्षा दीपक पवार यांना जास्त मते मिळाली. शिवेंद्रसिंहराजेंचे मताधिक्य गत निवडणुकीपेक्षा निम्म्याने कमी झाले. या निवडणुकीत त्यांना ४७ हजारांच्यावर मताधिक्य मिळाले. शहरातील २५३ मतदान केंद्र क्रमांक रामाचा गोट, चिमणपुरा पेठ या परिसरात येते. या परिसरावर नगरसेविका मुक्ता लेवे यांचे वर्चस्व आहे. मात्र, येथूनच शिवेंद्रसिंहराजेंना २४१ तर दीपक पवार यांना ३५५ मते मिळाली. नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अविनाश कदम यांच्या वॉर्डमधील मंगळवार तळे व व्यंकटपुरा पेठ परिसरातील मतदान केंद्र क्र. २५४ मध्ये शिवेंद्रराजेंना १७१ तर दीपक पवार यांना ३७३ मते मिळाली. मतदार केंद्र क्र. २५५ वर शिवेंद्रराजेंना १५० तर दीपक पवारांना ३४८ मते मिळाली. नगरसेवक भाग्यवंत कुंभार यांच्या वॉर्डात येणाऱ्या करंजे पेठेतील मतदान केंद्र २६१ मधून शिवेंद्रराजेंना २२३ तर दीपक पवारांना २३६ मते मिळाली. पालिकेच्या गत निवडणुकीत लक्ष्मी टेकडी परिसरातून संदीप साखरे यांना निवडून आणण्यासाठी शिवेंद्रराजेंनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्याच परिसरातून त्यांना कमी मते मिळाली. फुटका तलाव परिसरातूनही शिवेंद्रसिंहराजेंपेक्षा दीपक पवारांना ज्यादा मतदान झाले. मल्हार पेठ, शनिवार पेठ, माची पेठ, भवानी पेठ, यादोगोपाळ पेठ, गुरुवार पेठ येथील मतदान केंद्रांवरही दीपक पवारांनी शिवेंद्रसिंहराजेंपेक्षा मताधिक्य जादा घेतले आहे. (प्रतिनिधी)यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र मनोमिलनाची ताकद क्षीण झाल्याचेच चित्र समोर आले. पालिकेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून ऐन निवडणुकीत एकमेकांचे पाय ओढाओढीचे राजकारण खेळल्याची जोरदार चर्चा आहे. दोन वर्षांवर नगरपालिका निवडणूक येऊन ठेपली असल्याने सर्वांनी मिळून झटून शिवेंद्रसिंहराजेंचे काम करणे अपेक्षित होते. मात्र, प्रचारात कार्यकर्त्यांची जी तळमळ असायला पाहिजे, ती तळमळच कुठे तरी हरविली गेल्याने शहरातून शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात जवळपास ५९ टक्के मतदान गेले. कुणी याला नगरसेवकांची बेफिकीरी म्हटले तर कुणी अतिआत्मविश्वास! पालिकेची निवडणूक दोन वर्षांवर येऊन ठेपली आहे. हीच बेफिकिरी पुढेही सुरुच राहिली तर दोन्ही आघाड्यांना अडचणीचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीने मोठा धडा दिला असल्याने ‘न्यूट्रल’ राहिलेली मंडळी तसेच कामापेक्षा टक्क्यांत गुंतलेल्या मंडळींना घरचा रस्ता दाखविला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राजेंची अटकेपार लढाई... पण सैन्याचा शत्रूशीच तह!
By admin | Published: October 22, 2014 10:09 PM