कोपर्डे हवेली : कऱ्हाड तालुक्यातील कृष्णा आणि कोयना नदीचा भाग हा ऊसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. अशा या पट्ट्यात काही शेतकरी बाजारपेठेत चांगली मागणी असलेल्या शेवंती जातीच्या फुलाचे उत्पादन घेत आहेत. यामध्ये कोपर्डे हवेली, पाली, भिकेश्वर वडोली, हेळगाव या गावांचा समावेश असल्याने असेच म्हणावे लागेल ऊसाच्या शिवाराला शेवंतीचा लळा लागला आहे.
कोपर्डे हवेली येथील शेतकरी शुभम चव्हाण यांनी पंचवीस गुंठे क्षेत्रावर पूर्वा व्हाईट जातीच्या शेवंती फुलांची लागवड केली आहे. फुलाचे तोडे सुरू झाले आहेत. सध्या त्यांची फुले मुंबई येथील मीनाताई ठाकरे बाजारपेठेत जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी त्यांना एका किलोला १२० रुपये दर मिळत आहे. चार दिवसाला दोनशे किलोचा तोडा होत आहे. चव्हाण यांनी २७ मार्चला शेवंतीच्या आठ हजार रोपांची लागवड केली. त्यासाठी पाच ट्रेलर शेणखत घातले. शेताची मशागत करून पाच फुटी सरी सोडून मल्चिंग आणि ठिबकचा वापर केला. वेळोवेळी औषधाच्या फवारण्या केल्या, वेगवेगळ्या पध्दतीची खते दिली त्यामुळे शेवंतीचे पीक जोमदार आले. रोपांची लागवड केल्यापासून सत्तर दिवसात फुलाचे तोडे सुरू झाले. यासाठी चव्हाण यांना एक लाख रुपये उत्पन्न खर्च आला आहे. एका झाडाला सुमारे एक ते सव्वा किलो फुले मिळतील, असा चव्हाण यांचा अंदाज आहे. सरासरी आठ टन फुलांची विक्री केल्यास त्यांना उत्पादन खर्च वजा करता सात लाखांचा नफा होण्याची शक्यता आहे.
चौकट...
शेवंतीच्या फुलाला दुर्गादेवी उत्सव आणि गणपती उत्सव या काळामध्ये मोठी मागणी असते. दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेता, एका किलोला दोनशे रूपयेच्या पुढे दर मिळतो.
चौकट
२५ गुंठे क्षेत्रावर आठ हजार रोपांची लागवड, एका किलोचा दर सध्या १२० रुपये, आठवड्यात दोन तोडे, एका तोड्याला दोनशे किलो फुले, चार महिने फुलांचे तोडे सुरू राहणार आहेत. उत्पादन खर्च एक लाख रुपये... तर खर्च वजा करता सात लाखांचा नफा, दुर्गादेवी, गणपती उत्सव या काळात दर वाढतात.
कोट...
माझे मित्र संजय चव्हाण आणि मी आम्ही टोमॅटोची शेती करण्याऐवजी शेवंतीच्या फुलांची लागवड केली आहे. दर चांगला मिळत असून, चार महिने फुलांचे तोडे सुरू राहणार आहे. खर्च वजा करता सात लाखांचा नफा मिळेल.
- शुभम चव्हाण,
शेतकरी, कोपर्डे हवेली.
०३ कोपर्डे हवेली
कोपर्डे हवेली येथील शुभम चव्हाण यांच्या शेतातील फुले बाजारपेठेत निघाली आहेत. (छाया : शंकर पोळ)