लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत असून सोमवारी उमेदवारी अर्ज माघारची शेवटची मुदत आहे. त्यामुळे साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर होत असून सोमवारी दुपारनंतरच गावोगावची निवडणूक कशी होणार, यावर शिक्कामोर्तब होईल. तसेच काही ठिकाणी बिनविरोधचा डंका असून बहुतांशी ठिकाणी दुरंगी, तिरंगी लढतींचे संकेत आहेत.
जिल्ह्यात गावपातळीवरील निवडणुकांना खूप महत्त्व आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक असेल तर राजकीय वातावरण आणखी ढवळून निघते. गावाचा कारभारी आपल्याच पक्षाचा, गटाचा असावा अशी तयारी प्रत्येकाचीच राहते. त्यामुळे वरिष्ठ लोकप्रतिनिधीही गावात जाऊन मोर्चेबांधणी करतात. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न होतो. आताही जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली असून लोकप्रतिनिधींनी प्रत्येक गावोगावी मोर्चेबांधणी करून व्यूहरचना आखणे, नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
जिल्ह्यात ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यामध्ये सर्वाधिक १३० ग्रामपंचायती या सातारा तालुक्यातील आहेत. यानंतर पाटणमधील १०७ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे, तर कऱ्हाड १०४, खटाव तालुका ९०, फलटण ८०, वाई ७६, जावळी ७५, माण तालुक्यात ६१, खंडाळा ५७, कोरेगाव ५६ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.
८७८ ग्रामपंचायतींसाठी ७ हजार २६४ जणांना निवडून द्यायचे आहे. पण, प्रत्यक्षात अडीचपट म्हणजे १७ हजार ६४२ जणांनी अर्ज दाखल केलेले. मात्र, ३० डिसेंबरला छाननी झाल्यानंतर १७ हजार ४०७ अर्ज राहिले. आता सोमवार, दि. ४ रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारी दुपारनंतरच निवडणूक लागलेल्या गावांचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराला खरी रंगत येणार आहे.
चौकट :
रुसवे, फुगवे काढण्यावर भर...
गावाचे राजकारण हे गट, तट आणि भावकी व गावकीतच खऱ्याअर्थाने रंगते. अनेकांना सदस्य, सरपंच व्हायचे असते. पण, प्रत्येकाच्या नशिबी हे येत नाही. सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे गावपातळीवरील नेत्यांना इच्छुकांचे रुसवे, फुगवे काढावे लागले आहेत. काहींनी तर उमेदवारी अर्ज ठेवायचाच म्हणून नेत्यांपासून फारकत घेतली आहे. त्यामुळे एकाच वॉर्डात अनेकजणांत लढत होणार आहे, तर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यावर सोमवारी दुपारी अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल.
...........................................................