खंडाळा : गावात पिण्याच्या पाण्याचा दिवसाआड होणारा पाणीपुरवठा, गावच्या विहिरीला पाणी नाही म्हणून शेजारच्या गावातील विहिरीतून तात्पुरते पाणी घेतलेले. शेती पाण्याचा तर शिवारात ठिपूसही नाही. पाण्याअभावी ज्वारीचे बाटूक झालेले. काही जागी तर पिके सुकून गेलेली, अशा परिस्थतीत असलेल्या वाघोशी, ता. खंडाळा गावची रब्बी हंगामाची पैसेवारी मात्र ६५ पैसे लावली गेली आहे. प्रत्यक्ष पाहणी न करताच महसूल विभागाने सरसकट हंगामी पैसेवारी जाहीर केली आहे. महसूल विभागाच्या या अजब कारभारामुळे ग्रामस्थ, शेतकरी मात्र अवाक् झाले आहेत.वाघोशी हे गाव तसे कायमच दुष्काळी छायेत असलेले गाव. दरवर्षी उन्हाळा जवळ आला की पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. प्रत्येकवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्यायच नाही; मात्र राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना राबवून गाव टँकरमुक्त करण्यात आले. तरीही पाणी पुरवठ्याच्या विहिरीलाच पाणी कमी पडल्याने दिवसाआड गावात पाणी येतेय.सध्या असणारा पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन शेजारील दापकेघरच्या पाणी योजनेच्या विहिरीवरून उपसा सुरू केला आहे. मात्र, उन्हाळ्याच्या सुरुवातीपूर्वीच ही स्थिती उद्भवल्याने पाणीपुरवठा सुरळीत चालणे कठीणच आहे. एकीकडे गावच्या पिण्याच्या पाण्याची ही अवस्था आहे. शेतीपंपाच्या पाण्याचा तर मागमूसही दिसत नाही. गावच्या परिसराची पाणीपातळीच खालावल्याने विहिरींना पाणी नाही. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारी, हरभराची पिके घेतली. खरी; मात्र पाण्याअभावी ती जळून गेली. ज्वारी पिकाची तर बाटुकं झालीत. लोकांच्या धान्याचंच तर सोडाच; पण जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झालायं. ऐन उन्हाळ्यात जनावरं कशी जोपासावी, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे, असं असताना महसूल विभागानं आणि कृषी विभागानं रब्बी हंगामाची पैसेवारी सर्व्हे करताना प्रत्यक्ष पाहणी न करताच ६५ पैसे लावली आहे. तहसील कार्यालयातून अशी आकडेवारी जाहीर झाल्याने गावकरीही अवाक् झाले आहेत. त्यामुळे या चुकीच्या सर्व्हेबाबत प्रत्यक्ष पाहणी करावी. अशा प्रकाराचा तक्रारी अर्ज वाघोशी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केला आहे. पाण्याअभावी पिके वाळून गेलीत आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेला अजब न्याय यामुळे इतर सवलती शेतकरी व ग्रामस्थांना मिळणे कठीण जाणार आहे. मात्र, याबाबत महसूल विभागाकडून अद्यापतरी कोणतीही हालचाल झाल्याची दिसून येत नाही. (प्रतिनिधी)गावाच्या शेती पाण्याची अवस्था बिकट आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही पैसेवारी जादा जाहीर झाल्याचे आश्चर्य वाटते. संबंधित विभागांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करावी. वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात येईल. महसूल विभागाने शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे.-गोरखराव धायगुडे, अध्यक्ष तंटामुक्ती समिती वाघोशीगावची पिण्याच्या पाण्याची योजनाच कशीबशी सुरू आहे. भविष्यात पाणी कमीच पडणार आहे. शेतीचेही नुकसान झाले असताना जाहीर झालेली पैसेवारी अजब आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.-मीता धायगुडे, सरपंच वाघोशी
हातात बाटूक तरीही म्हणे सधन गाव !
By admin | Published: January 22, 2016 11:51 PM