बावधन : गणेशोत्सव हा सण मांगल्याचा आहे. तो साजरा करताना त्याचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे. डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्य वाजवून हा सण उत्साहात साजरा करावा, कोणाच्या धार्मिक भावना दुखावतील, असे देखावे दाखवू नयेत, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा वाई पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश गलांडे यांनी दिला. दरम्यान, बावधन व परिसरातील गणेश मंडळांनी डॉल्बी मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बावधन येथे गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य यांची वाई पोलीस ठाण्याच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बावधनचे सरपंच सतीश पिसाळ यांनीही डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, सुरूवातीला बैठकीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जनादिवशी एक दिवस तरी डॉल्बीला परवानगी द्यावी, अशी विनंती पोलीस निरीक्षक गलांडे यांच्याकडे केली. तसेच जास्त पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी केली. यावर बावधनला जादा बंदोबस्त देण्याची व्यवस्था करतो. मात्र, डॉल्बीला परवानगी देणार नसल्याचे सांगितले. बैठकीला संतोष राजेभोसले, सदाशिव ननावरे, रामचंद्र कुंभार, संतोष पिसाळ, दिलीप कांबळे, अजित पिसाळ, शशिकांत पिसाळ, मदन भोसले, अर्जुन ननावरे व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
बावधनकरांचाही ‘डॉल्बी’ला दणका
By admin | Published: September 15, 2015 11:49 PM