सातारा : वाळूच्या ट्रॅक्टरवर भविष्यात कारवाई न करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना बावधन, ता. वाई येथील तलाठी शंकर मल्हारी कोळेकर (वय ३४, रा. धोम कॉलनी, वाई. मूळ रा. काळज, ता. फलटण) याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले.याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित तक्रारदाराचा वाळूचा ट्रॅक्टर दि. २३ रोजी तलाठी कोळेकर याने पकडला होता. मात्र, त्यावेळी कारवाई न करता ट्रॅक्टर सोडून दिला होता. परंतु भविष्यात वाळूच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी तलाठी कोळेकर याने ४० हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली.
तडजोडीनंतर २० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने कोळेकरच्या विरोधात लाचलुचपत अधिकाऱ्यांकडे रितसर लेखी तक्रार अर्ज दिला. त्यानुसार अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता कोळेकर हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी वाई तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानासमोर सापळा लावला.यावेळी तलाठी कोळेकर याला २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. वाई पोलीस ठाण्यात त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आनंदराव सपकाळ, हवालदार संजय साळुंखे, संजय अडसूळ, अजित कर्णे, प्रशांत ताटे, मारूती अडागळे, श्रद्धा माने, संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले आदींनी केली.