कऱ्हाड : मराठा आरक्षणासंदर्भात अनेक नेते वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करत आहेत. हे वक्तव्य करत असताना त्यांनी भान ठेवावे. त्याबरोबरच वाचाळ वीरांनी आपण काय बोलतो आहोत याकडे अधिक लक्ष द्यावे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पर्णकुटी या समाधी स्थळावरील आयोजित भजनकार्यक्रमास उपस्थिती लावली.अजित पवार म्हणाले, विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसे करायचे याची आदर्श मुहूर्तमेढ व शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांचे विचार, त्यांचे साहित्य हे आजही आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत.
Maratha Reservation: वाचाळवीरांनो काय बोलता याचे भान ठेवा, अजित पवारांचा नेत्यांना सल्ला
By दीपक शिंदे | Published: November 25, 2023 11:32 AM