सातारा : ‘‘सर्वसामान्य माणूस विवेकी असतोच. आपला विवेक जागृत ठेवत तो धर्माचे आचरण करत असतो व त्या विवेकी आचरणासाठीसाठी प्रसंगी तो आपले प्राणही पणाला लावतो व त्यामुळेच समाज बदलाला चालना मिळते. विवेकी होणे म्हणजे धर्माला सोडचिठ्ठी देणे नव्हे,’’ असे मत ख्रिस्ती धर्माचे अभ्यासक डॅनियल मस्करणीस यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित ‘ख्रिस्ती धर्मातील अंधश्रद्धा त्याचे निर्मूलन आणि विवेक’ या विषयावर वसई येथील आय. टी. इंजिनिअर आणि ख्रिस्ती धर्माचे अभ्यासक डॅनियल मस्करणीस यांचे ऑनलाईन व्याख्यान काल आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्रभरातील अंनिसचे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक यांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
मस्करणीस म्हणाले, “ दया, शांती, प्रेम हा येशूचा संदेश सांगणारा ख्रिस्ती धर्म युरोपियन मिशनऱ्यांच्या माध्यमातून आल्यामुळे तो भारतीयांना परका वाटला व त्यांच्या मनात त्या धर्माबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले.” त्यामुळे ख्रिस्ती धर्मातील अंधश्रद्धांचे स्वरूप समजावून देण्याआधी त्या धर्माच्या उगम, प्रसार, मतभेद व त्यातून निर्माण झालेले पंथ यांचा संक्षिप्त इतिहास त्यांनी सांगितला.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, “अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीवर नेहमीच आरोप केला जातो. अंनिस फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धेच्या विरोधात काम करते. तसेच अंनिसला चर्चकडून निधी पुरविला जातो. पण हे आरोप निखालस खोटे आहेत. अंनिस सर्वच धर्मातील अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवते, याचेच उदाहरण म्हणजे आजचे व्याख्यान आहे.”
येशूने शिकविलेली, आचारलेली नीती पुढे नेण्यासाठी ‘चर्च’ ही व्यवस्था निर्माण केली गेली; पण आज ही व्यवस्थाच कर्मकांडी बनली असल्याची टीका ॲड. अतुल अल्मेडा यांनी केली. अध्यक्षीय समारोप फ्रान्सिस अलमेडा यांनी केला. वक्त्यांचा परिचय वंदना माने केला, आभार प्रदर्शन हौसेराव धुमाळ यांनी केले. या ऑनलाइन कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रशांत पोतदार यांनी केले.