लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये जिल्ह्यातील १९२ जणांना १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. तसेच या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना होणार आहे. दरम्यान, या योजनेत गूळ प्रक्रियेला अधिक प्रधान्य मिळण्याची शक्यता आहे.
केंद्र शासनाच्यावतीने ही योजना नवीन सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वैयक्तिक शेतकरी, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी उत्पादन संस्था यांना प्रक्रिया उद्योगासाठी अर्थसहाय देण्यात येणार आहे. २०२०-२१ ते २०२४-२५ या वर्षांत ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी कृषी विभागाने पूर्ण तयारी केलेली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यात सर्वाधिक गूळ उत्पादन व प्रक्रियेवर अधिक भर देण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.
सातारा जिल्ह्याला एकूण १९२ चे उद्दिष्ट मिळालेले आहे. या उद्दिष्टांपैकी ५९ जणांचेच अर्ज आतापर्यंत मिळालेले आहेत. ५३ अर्जांवर प्रक्रिया सुरू झाली असून, ६ जणांनी अजून कागदपत्रे दिलेली नाहीत. या योजनेअंर्गत बँक कर्जाशी निगडीत प्रकल्प खर्चाच्या कमाल ३५ टक्क्यांपर्यंत किंवा १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. यामुळे उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फायदाच होणार आहे.
................
तालुकानिहाय उद्दिष्ट...
माण १८
खटाव १९
फलटण १८
कोरेगाव १७
खंडाळा १६
वाई १७
जावळी १५
महाबळेश्वर १५
सातारा २०
कऱ्हाड २०
पाटण १७
.................................
कोणाला घेता येणार लाभ...
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नत योजनेत वैयक्तिक शेतकरी, स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहायक उत्पादक संस्था आदी घटक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यांना अधिकाधिक १० लाखांपर्यंत अर्थसहाय्य करण्याची तरतूद या योजनेत आहे. तसेच प्रकल्पाच्या ३५ टक्क्यांपर्यंत मदत मिळू शकते, अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली.
.............................................
पोर्टलवर करावा लागतो अर्ज...
- जिल्ह्याला एक वर्षासाठी १९२ चे उद्दिष्ट मिळालेले आहे. या योजनेसाठी प्रकियाही सुरू झालेली आहे. त्यासाठी संबंधितांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावे लागत आहेत.
- या पोर्टलवर सातारा जिल्ह्यासाठी आतापर्यंत ५९ अर्ज आलेले आहेत. या योजनेतून लाभार्थी विविध प्रकारची उत्पादने घेऊ शकतात. तसेच या योजनेतून त्यांना स्वयंपूर्णही होण्याचा मार्ग सापडणार आहे.
.........................................................
कोणालाही उद्योग सुरू करता येणार...
- केंद्र शासनाची ही योजना ठराविक व्यक्ती, गटासाठी नाही. त्यामुळे या योजनेसाठी कोणीही अर्ज करून लाभ घेऊ शकतात. चणे, लाह्यासारखा छोटा प्रक्रिया उद्योगही यामधून करता येऊ शकतो.
- जिल्ह्यासाठी उद्दिष्ट आले असले, तरी त्यांना लाभ देण्याचे काम सुरू झालेले आहे. कृषी विभागाकडून ५३ अर्जांवर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच खाद्य उद्योग सुरू होणार आहेत.
- जिल्ह्यात या योजनेअंतर्गत गूळ प्रक्रियेचा अधिक विचार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
..................................................................