येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे खजिनदार संजय बदियाणी अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे ज्येष्ठ संचालक मानसिंगराव पाटील, सुहास डोळ, राजेंद्र माने, शिवाजी पवार, अख्तर आंबेकरी, सुहास पवार, मोहसीन आंबेकरी, जयंत बेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सौरभ पाटील म्हणाले, शिवाजी शिक्षण संस्थेने कोरोना कालावधित भरीव अशी आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली. हजारो रुग्णांचे प्राण वाचवले. विद्यार्थ्यांनी स्पर्धांत भाग घेतल्यामुळे त्यांना नेतृत्वाची कसोटी लाभते. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही. त्यावेळी खचून न जाता पुन्हा मोठ्या धैर्याने पुढे येऊन आपल्या जीवनात यशस्वी झाले पाहिजे.
संजय बदियाणी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, यासाठी संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षात वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. त्यामध्ये संस्था निश्चितच यशस्वी होईल.
दरम्यान, यावेळी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना शिल्ड, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. आदित्य माने, हेमलता कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक बी. बी. साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. टी. डी. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक ए. बी. चव्हाण यांनी आभार मानले.