संतोष विठ्ठल काकडे (रा. साळशिरंबे) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत लक्ष्मण बापू यमगर (मूळ रा. अकुळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव जिल्ह्यातील अकुळ येथील लक्ष्मण यमगर हे फिरस्ते मेंढपाळ असून ते दरवर्षी जिंती विभागात मेंढ्यांचा कळप घेऊन येतात. सध्याही ते या भागात मेंढ्या घेऊन आले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ इराण्णा, पत्नी मंजुळा व भावजय शोभा हे आहेत. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण यांच्यासह इराण्णा यांनी मेंढ्या चारल्यानंतर ते साळशिरंबे येथील तलावावर मेंढ्यांना पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी संतोष काकडे हा हातात कुऱ्हाड घेऊन त्याठिकाणी आला. या भागात मेंढ्या चारायच्या नाहीत, असे म्हणून त्याने इराण्णा यांच्यावर कुऱ्हाडीने घाव घातला. त्यामध्ये इराण्णा हे जखमी झाले. त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असून संतोष काकडे याच्यावर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हवालदार उत्तम खराडे तपास करीत आहेत.
मेंढ्या चारण्याच्या कारणावरून कुऱ्हाडीने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:42 AM