महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील भेकवली गावात शेतातील पाटातून पाणी बाहेर काढण्याच्या कारणावरून लाकडी दांडक्याने मारहाण करत दमदाटी केली. याप्रकरणी अजय ऊर्फ दगडू किसन केळगणे, अंकुश किसन केळगणे व सतीश सावजी केळगणे (सर्व रा. भेकावली) या तिघांविरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अलका धोंडीराम केळगणे यांनी फिर्याद दिली. पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार भेकवलीमधील खोंड नावाच्या शिवारात पावसाचे पाणी पाटाने बाहेर काढण्यासाठी अलका धोंडीराम केळगणे त्यांचा मुलगा रुपेश केळगणे, पती धोंडिराम केळगणे गेले होते. पाट काढून परतल्यानंतर घरी फिर्यादी महिलेचे दीर सावजी बाबू केळगणे, जाऊ मंगल सावजी केळगणे, दीर किसन बाबू केळगणे, जाऊ इंदूबाई केळगणे हे शेतातील पाणी बाहेर काढण्याबाबतची चर्चा करीत होते. शेतातील पाणी बाहेर काढण्याच्या कारणावरून अलका केळगणे यांचा मुलगा रुपेश याचा अजय ऊर्फ दगडू किसन केळगणे, अंकुश किसन केळगणे यांनी दोन्ही हात पकडून सतीश सावजी केळगणे याने हातातील दांडक्याने मारहाण केली तर भांडण सोडविण्यासाठी गेलेले अलका व तिचे पती यांनादेखील दांडक्याने मारहाण केली. मारहाणीत दोघे जखमी झाले. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर सातारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.