लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शाहूपुरीतील राष्ट्रीय एकात्मता संघाच्या वतीने शाहूपुरीसाठी ‘सुंदर माझे घर’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हुतात्मा स्मारकास अभिवादन करून या कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला.
याबाबत माहिती अध्यक्ष भारत भोसले यांनी दिली. कार्यक्रमास शोभाताई केंडे, सुहास वहाळकर, सुरेश शेटे, शालाप्रमुख एस. एस. क्षीरसागर व सहकारी स्टाफ राम रेवाळे, रमेश इंदलकर, जगदीश भोसले, संजय बारंगळे, महेश जांभळे, गणेश वाघमारे, कट्टा ग्रुपचे संकेत परामणे उपस्थित होते. संस्थेच्या वतीने उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेची व देशसेवेची शपथ देण्यात आली. ‘सुंदर माझे घर’ या स्पर्धेत शाहूपुरी येथील रहिवासी सहभाग घेऊ शकतात. या स्पर्धेच्या अनुषंगाने संबंधित कुटुंबाने मागील काळाच्या तुलनेत घरगुती गॅस पाणी बचत करणे अपेक्षित आहे. तसेच प्लॅस्टिकविरहित व स्वच्छ ठेवणे, अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा वापर करणे, घरातील सांडपाण्याचे घरच्या बागेसाठी सुयोग्य नियोजन करणे, घराचा परिसर, टेरेसचा वापर करून पालेभाज्या, फळभाज्यांचे उत्पादन घेणे, रेन हार्वेस्टिंगची व्यवस्था असणे आदी बाबींच्या आधारे गुणांकन देण्यात येणार आहे.
गुणांच्या आधारे पहिले तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ असे एकूण पाच विजेते अंतिमत: निवडले जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कुटुंबांनी नावनोंदणी ३० ऑगस्टपर्यंत संस्थेकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
................