तांबवे : वृक्ष ही ऑक्सिजन देणारी मोठी संपत्ती आहे. वृक्षाला जात-पात नसते. वृक्षाशिवाय गडकोटांचे सौदर्य वाढणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही वृक्ष संवर्धन केले होते. त्यामुळे गडावर वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन केले पाहिजे. हीच खरी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना ठरेल, असे प्रतिपादन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले वसंत गडावर (ता. कराड) १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीचे औचित्य साधत ४०० वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. वृक्ष संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या टीम वसंतगड व दुर्गप्रेमी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी वासू पाटील, शिवाजी पाटील व दुर्गप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
वसंत गडावर पोहोचल्यानंतर सयाजी शिंदे यांनी वडाच्या नावाने, आंब्याच्या, चिंचेच्या नावाने चांगभलं, पिंपळाच्या नावाने चांगभलं, येऊन येऊन येणार कोण झाडाशिवाय हायच कोण, असा जयघोष करीत गडावर ४०० झाडे लावली. दुर्गप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत गडावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी किल्ले वसंतगडवर निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, अंतर्गत व टिम वसंतगड, तसेच परिसरातील दुर्गप्रेमी शिवभक्त व विद्यार्थी, विद्यार्थिनी, सुपने आबाईनगर, वसंतगड, पश्चिम सुपने येथील दुर्ग, निसर्गप्रेमी यांच्या सहकार्याने ४०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी लेखक अरविंद जगताप ,वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे दिनेश कदम, शिवाजी पाटील, अमित नलावडे, दत्तात्रय जामदार, अर्जुन कळंबे, डॉ. धनंजय जाधव, विवेक कुराडे, सचिन महाडिक, रवींद्र यादव, मनसे सातारा जिल्हा सचिव चंद्रकांत पवार, गणेश काटकर तसेच कराड तालुक्यातील व टीम वसंत गडचे मावळे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो :