कोरेगाव : ‘आजवरच्या समाजकारणामध्ये मी विकासाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. बेकायदा गोष्टींना मी कधीही थारा देत नाही. प्रतापसिंंहनगर आणि खेड परिसरात बोकाळलेली गुंडगिरी आणि बेकायदा कामे रोखण्यासाठी पोलिसांना आदेश दिले होते; मात्र कलम ३५४ आणि अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने ते घाबरतात,’ असा थेट आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. कोरेगावातून विजयी झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी पाचारण केल्याने ते मुंबईत गेले होते. रविवारी मतदारसंघात दाखल झाल्यानंतर त्यांनी स्थानिक पत्रकारांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आणि निवडणुकीतील लढत आणि विजय याबाबत सविस्तर चर्चा केली. ‘मतदारसंघात सातारा तालुक्याने भरभरुन मते दिली; मात्र खेड विभागात अपेक्षित मताधिक्य कसे काही मिळाले नाही? त्या विभागात विरोधकांनी केलेला टोकाचा आणि टीकेचा प्रचार याविषयी तुमची भूमिका काय,’ या प्रश्नावर त्यांनी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दलाला लक्ष्य केले. ‘आताच्या निवडणुकीत ज्या प्रकारे प्रचार झाला, तो योग्य नव्हता. वास्तविक, मी दोनच वर्षांपूर्वी माझी भूमिका अत्यंत स्पष्टपणाने मांडली आहे. मी विकासाला सहकार्य करतो. बेकायदा गोष्टींना नाही. प्रतापसिंंहनगर परिसर माझ्या मतदारसंघात येतो. तेथे सामान्य जनता वास्तव्य करते. त्यांच्यासाठी मी निधी उपलब्ध करुन विकासकामे केली आहेत. मला जनतेशी नाते जोडायचे आहे. अन्य कोणाशीही नाही. आजवरच्या वाटचालीमध्ये मी विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.’ ‘सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने काम करत असताना प्रतापसिंंहनगर आणि खेड परिसरात अनेक चुकीचे प्रकार घडले. विकसकाला मारहाण आणि पैसे उकळण्याबाबत तक्रारी झाल्या, त्यावेळीच मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना थेट कारवाई करण्यासाठी आदेश दिले होते. चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी माझी पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावेळेस ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे तेथे चुकीच्या गोष्टी वाढत चालल्या आहेत. माझा काडीमात्र संबंध नसताना पोलीस जाणीवपूर्वक माझ्या नावाचा वापर करुन स्वत:ची बाजू सावरताना दिसतात. कलम ३५४ आणि अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने ते आपली भूमिका बजावण्यात कमी पडतात,’ असा आरोप आमदार शिंंदे यांनी केला. (प्रतिनिधी)एखाद्या सामान्य माणसावर लगेच कारवाई होते; मग या प्रकारात पोलिसांचे हात काय बांधले गेले आहेत काय? माझा या गोष्टींशी तसूभर संबंध नाही. निक्षून सांगतो की, याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना कारवाईबाबत आदेश दिले होते. आजही त्यांची साक्ष आपण काढू शकतो. एकंदरीत पोलीस यंत्रणा दोषी असल्याने खेड विभागात गुंडगिरी वाढली आहे, असे खेदाने म्हणावे लागते.- आमदार शशिकांत शिंदे
‘अॅट्रॉसिटी’मुळे सातारचे पोलीस प्रतापसिंहनगरातील गुंडांना भितात
By admin | Published: October 26, 2014 9:41 PM