खटाव : ‘कोरोनाची वाढणारी रुग्ण संख्या व संशयितांच्या पार्श्वभूमीवर होम आयसोलेशन असलेल्या लोकांना विलगीकरण सेंटरमध्ये ठेवून वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी सहकार्य करण्याची ही वेळ आहे. आपला आजार लपवून आपले कुटुंब तसेच समाजाला बाधित करण्यापेक्षा विलगीकरण सेंटरमध्ये थोडक्यात आहे तोपर्यंतच तपासणी करून दाखल व्हावे,’ असे आवाहन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी केले आहे.
खटावमध्ये आयसोलेशन सेंटर तयार करण्याकरिता त्यांनी भेट दिली. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पॉझिटिव्ह ; पण लक्षणे नसलेल्या लोकांसाठी गावातील जिल्हा परिषद शाळा ताब्यात घेऊन स्वतंत्र आयसोलेशन सेंटर ताबडतोब तयार करून तेथे अशा रुग्णांना दाखल करावे. या सेंटरवर ग्रामपंचायतीचे तसेच ग्राम दक्षता कमिटीचे नियंत्रण राहणार असून, आरोग्य विभागामार्फतही येथे लक्ष ठेवले जाणार आहे. ग्रामविकास अधिकारी यांना अशा सूचनाही यावेळी कासार यांनी दिल्या.
यावेळी तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, राहुल पाटील, डॉ. पराग रणदिवे, अशोक कुदळे, अर्जुन पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. घरी होम क्वारंटाइन केलेले लोक पाच ते सात दिवसांत बाहेर पडून सुपरस्प्रेडर ठरत आहेत. होम क्वारंटाइन केलेले कोविड रुग्णही १४ ते १७ दिवस सामान्य लोकांच्या संपर्कात नाही आले पाहिजे. कोविड पाॅझिटिव्ह रुग्ण हा १३ ते १४ दिवस सामान्य निरोगी व्यक्तीस संसर्ग पसरवू शकतो. आपल्या कुटुंबाचे जबाबदार घटक आहात म्हणून प्रशासनाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहिले पाहिजे.
०५खटाव
कॅप्शन : खटावमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आयसोलेशन सेंटर सुरू करण्याबाबत पाहणी करताना प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, आरोग्य अधिकारी युनूस शेख व पदाधिकारी उपस्थित होते.