प्रमोद सुकरे
कराड:
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. याला सातारा जिल्हाही अपवाद नाही. बाधितांची दररोज समोर येणारी आकडेवारी प्रत्येकाला धडकी भरवत आहे. तर मृतांचा आकडा मन पिळवटून टाकत आहे. या सर्व परिस्थितीत कराड मधील सुमारे बारा हॉस्पिटल, कोरोना सेंटर रुग्णांना आधार वाटत आहेत. येथे बाधित रुग्णाला सध्या बेड उपलब्ध होताहेत पण, गरजूंना रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने नातेवाईक हैराण झालेले आहेत.
भौगोलिक दृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कऱ्हाडमध्ये चांगल्या हॉस्पिटलची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे रुग्णांना उत्तम प्रकारचा उपचार सहज शक्य झाला आहे. कोरोनाच्या महामारी संकटातही येथीलही १२ रुग्णालये चांगले काम करीत आहेत. गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी येथील कृष्ण हॉस्पिटलने तर स्वतःच कोविड उपचार सुरू करण्याची परवानगी मागत एक पाऊल पुढे टाकले होते .आजही कृष्णा सह सर्व रूग्णालयात कोरोना बाधितांवर चांगले उपचार केले जात आहेत. कऱ्हाडला सध्या ८०० वर बेड उपलब्ध आहेत.
तालुक्यात बाधितांची संख्या मोठी आहे. त्यातील गरजूंना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला जातो. त्यावेळी त्यांना बेड उपलब्ध होणार का? हा पहिला प्रश्न पडतोय पण, सध्या तरी कऱ्हाडला बेड अपुरे पडतात असे चित्र नाही. एकदा का बेड मिळाला की रुग्णासह नातेवाईक सुटकेचा नि:श्वास सोडत आहेत. पण डॉक्टर ज्यांना इंजेक्शन देण्याची गरज सांगतात त्यांना हे इंजेक्शन उपलब्ध होत नाही. या इंजेक्शनची टंचाई असल्याने नातेवाईक चिंतित आहेत .
पूर्वी हे रेमडेसिविर इंजेक्शन मेडिकल दुकानांमध्ये उपलब्ध होते. आता मात्र प्रशासनाने ज्या रुग्णालयात रुग्ण उपचार घेतोय तेथील डॉक्टरांच्या मागणीनुसार त्याच रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. पण, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होताना दिसत नाही. त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू झाला आहे. हा खेळ कधी संपणार? असा सवाल संतप्त नातेवाईक करीत आहेत.
चौकट
नातेवाईक बसताहेत ताटकळत ..
ज्या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहे; तेथेच इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. पण इंजेक्शनचा तुटवडा असल्याने रुग्णाचे नातेवाईक त्या त्या हॉस्पिटलच्या औषध विभागाच्या समोर ताटकळत उभे असल्याचे दिसते. तरीही तीस ते पस्तीस टक्के रुग्णांसाठी हे इंजेक्शन उपलब्ध होत आहे. पण ज्यांना इंजेक्शन मिळत नाही त्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर तणाव वाढलेला दिसत आहे.
चौकट
त्याला जबाबदार कोण ?
अपुऱ्या रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्धतेमुळे सर्वच अत्यंत गरजू रुग्णांना हे इंजेक्शन देता येत नाही. अशा परिस्थितीत जर एखादा रुग्ण इंजेक्शन अभावी मृत्युमुखी पडला तर त्याला जबाबदार कोण? नातेवाईक तर संबंधित रूग्णालयाला दोष देतील पण यात रुग्णालयाचा दोष काय? असा सवाल रुग्णालयाचे प्रशासन करू लागले आहे.
कोट
जिल्हा औषध प्रशासनाकडे आम्ही असणाऱ्या रुग्णांच्या गरजेप्रमाणे रेमडेसिविरची मागणी करीत असतो. मात्र काही दिवसांपूर्वी हे इंजेक्शनच उपलब्ध होत नव्हते .आता उपलब्ध व्हायला लागले आहेत पण, मागणीच्या ३५ टक्के साठा मिळत आहे. त्यामुळे सदरची इंजेक्शन नेमक्या कोणत्या रुग्णाला द्यायची हा प्रश्न पडतोय. रुग्णांचे नातेवाईक व्यवस्थापनाबरोबर वाद घालत आहेत. त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अमित चव्हाण
संचालक, सह्याद्री हॉस्पिटल कराड
फोटो :हाॅस्पिटलच्या बाहेर बसलेले नातेवाईक